शिक्षणात राजकारण येता कामा नये- सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 12:53 AM2018-12-04T00:53:17+5:302018-12-04T00:53:26+5:30
शिक्षण क्षेत्रात चुकीच्या गोष्टी घडल्यास त्याविरोधात आवाज उठवण्याची आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.
पुणे : ‘शिक्षण क्षेत्रात चुकीच्या गोष्टी घडल्यास त्याविरोधात आवाज उठवण्याची आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. शिक्षणाचे धोरण, शिक्षण अधिकार, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांनी काम करण्याची गरज आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. शिक्षणात राजकारण येता कामा नये, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक व उपक्रमशील शाळा पुरस्कार सोहळ्यात सुळे बोलत होत्या. पुणे जिल्ह्यांतील ५२ गुणवंत शिक्षकांना आणि १३ उपक्रमशील शाळांना त्यांच्या हस्ते गौरवले. खासदार मधुकर कुकडे, आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादीचे
जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा राष्ट्रवादी महिलाध्यक्षा वैशाली नागवडे, शहराध्यक्षा रूपाली चाकणकर, अॅड. अशोक खळदकर, शिवाजी खांडेकर, सुरेश कांचन, शिवाजी किलबिले, दिलीप वाल्हेकर, राजेश गायकवाड या वेळी उपस्थित होते.
अरुण थोरात यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जितेंद्र देवकर यांनी सूत्रसंचालन केले. बाळकृष्ण काकडे यांनी आभार मानले.
>सुळे म्हणाल्या, ‘आधुनिक काळात तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले, तरी शिक्षकच हा शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. शिक्षकाला बाजूला ठेवून केवळ तंत्रज्ञानामुळे शिक्षणव्यवस्था सुधारणार नाही. शिक्षकांनी शिक्षणासंदर्भात धोरणात्मक बदल करण्याची गरज आहे. शिक्षणाच्या बाबतीत आज इतिहाससारख्या विषयाच्या संदर्भात घटना घडत आहेत.’
काळे म्हणाले, ‘समाजाचे शिल्पकार म्हणून शिक्षकांकडे पाहिले जाते. शिक्षक चुकला तर अख्ख्या पिढीचे नुकसान होेते. सातत्यातून नवीन काहीतरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची आज गरज आहे. गेली ६ वर्षे शिक्षक, तसेच शिक्षकेतर कर्मचारी भरतीदेखील बंद आहे. आगामी अधिवेशनात शिक्षकांच्या प्रश्नांबाबत अर्थमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल व शिक्षकांसाठी सातवा आयोग हा विनात्रुटी मिळण्यासाठी प्रयत्न करू.’