डॉक्टरांबद्दल समाजाचा दुराग्रह नको

By admin | Published: March 25, 2017 04:07 AM2017-03-25T04:07:17+5:302017-03-25T04:07:17+5:30

समाजात डॉक्टरांप्रती असलेला आदर कमी झाला आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले ही चिंतेची बाब आहे.

Do not disturb the society about doctors | डॉक्टरांबद्दल समाजाचा दुराग्रह नको

डॉक्टरांबद्दल समाजाचा दुराग्रह नको

Next

समाजात डॉक्टरांप्रती असलेला आदर कमी झाला आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले ही चिंतेची बाब आहे. डॉक्टरांकडे पाहण्याच्या समाजाचा दृष्टीकोन असाच राहिला आणि समाजाने अशा प्रकारचा दुराग्रह बाळगला तर वैद्यकीय क्षेत्राकडील तरुणांचा कल कमी होईल. त्यामुळे समाज चांगल्या डॉक्टरांचा मुकेल, असे मत ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.के.एच.संचेती यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. डॉक्टरांनी आर्थिक पारदर्शकता बाळगावी आणि सामान्यांशी संवाद वाढवावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाइकांकडून होणारी मारहाण चिंताजनक आहे. आजकाल लोकांमधील संयम कमी झाल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. कायदा हातात घेणे हा पर्याय होऊ शकत नाही. समाजाने डॉक्टरांबद्दल असाच दुराग्रह बाळगला आणि संशयी दृष्टिकोन ठेवला तर तरुण पिढी या व्यवसायात येताना दहादा विचार करेल. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांची संख्या घटली तर समाज चांगल्या डॉक्टरांना मुकेल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, ‘रुग्णाची प्रकृती गंभीर असेल तर नातेवाइकांची मानसिकता बदलते. डॉक्टरांबद्दल त्यांच्या मनात संशय निर्माण होतो. गंभीर परिस्थितीत कोणतेही उपचार सुरू केल्यानंतर परिणाम दिसायला थोडा वेळ लागतो. मात्र, तेवढा संयम बाळगला जात नाही. डॉक्टरांबद्दलचा आदरही दिवसेंदिवस कमी होत आहे. अशा वेळी, डॉक्टर आणि समाज यांच्यामध्ये संवाद होणे आवश्यक आहे. हा संवाद वाढवण्याची जबाबदारी डॉक्टरांवरच जास्त आहे. त्यांनी आर्थिक पारदर्शकता बाळगायला हवी. डॉक्टरकडे वेळ नाही, ते रुग्णांना पुरेशी समाधानकारक उत्तरे देत नाहीत, अशी तक्रार रुग्णांकडून ऐकायला मिळते. डॉक्टर पैसे उकळतात, असा समजही सर्वदूर पसरलेला दिसतो. तो काहीसा रास्त आणि काहीसा अनाठायी आहे. हा समज दूर करण्यासाठी डॉक्टरांनी नातेवाइकांना रुग्णाची परिस्थिती शांतपणे समजावून सांगायला हवी, उपचारांसाठी लागणारा वेळ, खर्च, संभाव्य धोका आदी बाबींची कल्पना द्यायला हवी. अशा संवादातून गैरसमज दूर होऊ शकतील.
हाडांचे दुखणे लोक गांभीर्याने घेत नाहीत, असेही संचेती म्हणाले. ‘नियमित व्यायाम, सकस आहार ही आरोग्यसंपन्न जीवनाची गुरुकिल्ली आहे. केवळ चालण्याचा व्यायाम करुन सुदृढ राहता येत नाही. स्नायूंच्या विकासासाठी सूर्यनमस्कार हा जगातील सर्वोत्तम व्यायाम आहे. त्यामुळे सर्वांनी व्यायामावर भर द्यायला हवा. बरेचदा हाडांचे दुखणे अंगावर काढले जाते. दुर्लक्ष केल्याने काही कालावधीने मोठे दुखणे उद्भवते. त्यामुळे रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावेत. आजकाल अद्ययावत तंत्रज्ञानामुळे उपचार आणि शस्त्रक्रिया सुलभ झाल्या आहेत. रोबोटिक आॅपरेशनचे तंत्रज्ञानही वेगाने वाढत आहे. यामध्ये डॉक्टरऐवजी संगणकाच्या सूचनेनुसार डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे रोबोच शस्त्रक्रिया पार पाडतो. सध्या नेव्हिगेशन सिस्टिममध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे.
सांधारोपण आणि हाडे बसवण्याच्या शस्त्रक्रियांमध्ये खूप प्रगती झाली आहे. शस्त्रक्रिया झाल्यावर एक-दोन दिवसांत रुग्णाला घरी जाता येते, त्याच्या प्रकृतीतही झपाट्याने सुधारणा होते. शस्त्रक्रियेनंतरच्या वेदनाही तंत्रज्ञानामुळे कमी झाल्या आहेत. मात्र, वैद्यकीय सेवा महागड्याही झाल्या आहेत. अद्ययावत उपकरणे, औषधोपचारांच्या किमती वाढल्याने वैद्यकीय सेवेवरील खर्च वाढला आहे. भविष्यात, कमी खर्चात होणाऱ्या शस्त्रक्रियेचे संशोधन होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.
राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असला तरी घरातून झालेल्या कौतुकाचे मोठेपण वेगळेच असते. पुणे ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. त्यामुळे प्रतिष्ठेचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर होणे, ही आनंदाची बाब आहे. ८१ व्या वर्षी पुरस्कार मिळत असल्याने इच्छाशक्ती आणि कार्यक्षमता वाढीस लागते. अजूनही अनेक वर्षे रुग्णांची सेवा करायची आहे. अनेक वर्षे काम करून रुग्णांच्या वेदना दूर करायच्या आहेत, अशी भावना डॉ. संचेती यांनी पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केली.

Web Title: Do not disturb the society about doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.