'दारू नको, दूध प्या' पुण्यात सामाजिक संस्थांचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 07:26 PM2018-12-31T19:26:50+5:302018-12-31T19:34:11+5:30
३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला पुण्यात 'दारू नको, दूध प्या' या शीर्षकाखाली आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र संस्थेच्या अंतर्गत दुधाचे वाटप करण्यात आले.
पुणे : ३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला पुण्यात 'दारू नको, दूध प्या' या शीर्षकाखाली आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र संस्थेच्या अंतर्गत दुधाचे वाटप करण्यात आले. शहरातील गोपाल कृष्ण गोखले पथ अर्थात फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर हा उपक्रम साजरा करण्यात आला.यावेळी बाहुबली आणि कटप्पा यांच्या वेशात नागरिकांना दारू न पिण्याची विनंती केली जात होती.
दारूचे व्यसन आणि त्यामुळे शरीराचे, कुटुंबाचे, समाजाचे होणारे नुकसान लक्षात घेत मागील काही वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. संध्याकाळी सूर्य मावळल्यावर रात्री उशिरापर्यंत गुडलक चौकातील सिग्नलवर तरुणांनी फलक दाखवत दुधाचे वाटप करून प्रबोधन केले. या उपक्रमामुळे ३१ डिसेंबरच्या रात्री नशेच्या आवेगात हमखास होणारे अपघात कमी होतील अशी आशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनीही या उपक्रमाला हजेरी लावत दुधाचे वाटप केले. यावेळी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक डॉ अजय दुधाणे म्हणाले की, गेले अनेक वर्ष आम्ही हा उपक्रम राबवतोय. त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातून दारूमुळे जाणारे जीव आणि उध्वस्त होणारी कुटुंब रोखण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे भविष्यात शहरातील सर्व चौकात असा उपक्रम राबवण्याची गरज वाटते.