न खाता-पिताच धावलो, लय आबदा झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 10:24 PM2019-01-07T22:24:32+5:302019-01-07T22:25:17+5:30
सैन्यभरतीसाठी आलेल्या तरुणांचे हाल : १११ पदांसाठी संपूर्ण देशातून आले हजारो उमेदवार
पुणे : ‘चारशे मुलांची एक बॅच आणि त्यातून चारच लोक निवडले... धुरळ्यात पळायला लावले, नाका, डोळ्यांत, कानात नुसता धुरळाच धुरळा गेला... ना खायची सोय होती, ना पाण्याची सोय. सकाळी न खाता-पिताच आम्ही धावलो... लय आबदा झाली... या भावना आहेत सैन्य भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या तरुणांच्या.
कॅम्प परिसरातील रेसकोर्स मैदानावर मराठा लाइट इन्फन्ट्री या प्रादेशिक सेनेच्या १०१ बटालियनद्वारे ही भरती आयोजित करण्यात
आली आहे. आजपासून ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून, १२ जानेवारीपर्यंत चालणार आहे. यामध्ये जवान ८९ पदे, क्लार्क, स्टाफ ड्यूटी २ पदे, जवान हेअर ड्रेसर्सची २ पदे, वॉशरमॅन १ पद आणि १२३ इन्फन्ट्री बटालियन ग्रेनेडर्समध्ये १५ जवानांची पदे भरली जाणार आहेत. इच्छुकांची शारीरिक परीक्षा आज (दि. ७) आणि उद्या (दि. ८) होत आहे. त्यानंतर ९ ते १२ आरोग्य तपासणी होणार आहेत. सोमवारी महाराष्टÑ, गुजरात, दादरा आणि नगर हवेली, दीव व दमण आणि लक्षद्वीप येथील तरुणांची भरती होती. मंगळवारी तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, आंध्र प्रदेश, गोवा आणि पॉँडेचेरी या राज्यांतील तरुणांची भरती होईल. ही भरती देशभरातील तरुणांसाठी असल्याने सात हजारांहून अधिक जण यासाठी पुण्यात आले आहेत. त्यामुळे रविवारी रात्री कॅम्प परिसर आणि रेसकोर्स परिसरात तरुणांचे जथे पाहायला मिळाले. रात्री रस्त्यांवरच झोपून रात्र काढली. या तरुणांसाठी कोणतीही सोय सैन्य दलातर्फे करण्यात आली नव्हती. त्यामुळे रात्री खाण्याचे आणि पाण्याचे हाल झाले. अनेक ठिकाणी शेकोटी करून तरुण रात्रभर जागेच होते. तसेच सकाळीदेखील अनेक जण काहीच न खाता भरतीमध्ये सहभागी झाले होते.
सर्व सोयी केल्याचा दावा
भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही सर्व सोय केली होती. त्यांच्या जेवणाची व पाण्याचीही सोय झाली असून, त्यांना कसलाही त्रास झाला नसल्याची माहिती सदर्न कमांडच्या अधिकाºयांनी दिली.
चारशे जणांतून चार जणांची निवड
च्भरतीच्या ठिकाणी चारशे जणांचे संघ तयार केले होते. या चारशे जणांना सुमारे अडीच किलोमीटर धावण्यास सांगण्यात येत होते.
च्त्यातून पहिल्या चार जणांची निवड करण्यात येत होती. त्यानंतर त्यांची उंची आणि १० पुलअप्स करायला सांगितले जात होते.
च्यातून निवडलेल्या उमेदवारांची आरोग्य तपासणी दोन दिवसांनी होणार आहे, असे तरुणांनी सांगितले.
गावाकडं लय थंडीय, हितं कायच नाय...
च्पुण्यात १० अंशाच्या आसपास रात्री थंडीचा पारा होता. तेव्हा या थंडीत तरुणांना रस्त्यावर झोपावे लागले. यावर तरुणांनी मात्र थंडीचा आनंद घेतल्याचे सांगितले. ‘‘इथं काय लय थंडी नाय हो, आमच्या गावाकडं या मग कळल थंडी किती असती ते. मोकळ्या रानात झोपतो आम्ही, आम्हाला कसली वाजतेय थंडी. इथं देशसेवा करण्यासाठी आलोय आम्ही, थंडी तर सीमेवर पण असणार की, त्याला काय भ्यायचं एवढं’’ अशा प्रतिक्रिया तरुणांनी दिल्या.
मी आणि माझे दोन मित्र रविवारी रात्री पुण्यात आलो. येथे मैदानाच्या जवळच आम्ही रात्रभर थांबलो. खाण्याची आणि पाण्याची काहीच सोय नसल्याने लय आबदा झाली. सकाळीपण काहीच नव्हते, त्यामुळे न खाताच आम्ही धावलो. धावताना आमच्या समोर ट्रक असायचा, त्यामुळे खूप धूळ उडायची. ती डोळ्यांत, नाकात, कानात जात होती. धावण्यात आम्ही कमी पडलो, आता परत गावी जाणार. यापूर्वी कोल्हापूरच्या भरतीला गेलो होतो. ही दुसरी वेळ होती. मी बीएस्सी द्वितीय वर्षाला आहे. नोकरी नसल्याने सैन्यात भरती व्हायचे म्हणून प्रयत्न करतोय.
- सुशांत सुरवे, सांगली
मराठवाड्यात यंदा पाऊसच पडला नाही. त्यामुळे पाणीच नाही. शेती करता येईना आणि धंदा तर काहीच नाही. मग करायचे काय म्हणून सैन्यभरतीसाठी आलोय. मी मोटार- सायकलवर आईसोबत उस्मानाबादवरून रात्री आलो. रात्री येथे काहीच सोय नव्हती. स्वच्छतागृहाची सोय हवी होती.
- अरुण नागरगोजे, उस्मानाबाद