जनतेसमोर मतं मागताना लाज वाटत नाही का? उद्धव ठाकरेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 08:54 PM2019-04-25T20:54:04+5:302019-04-25T20:56:24+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ चाकण येथे जाहीर सभा घेतली.
पुणे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिरुर मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर नाव न घेता टीका केली. तसेच आमची युती ही शेतकऱ्यांसाठी आणि तुमच्यासाठी झालेली आहे. जाहिरांतींमधून लाज वाटते का ? असे आम्हाला विचारणारे यांचा कधी लाजेशी संबंध आला आहे का?. जनतेसमोर मतं मागताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी महाआघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ चाकण येथे जाहीर सभा घेतली. त्यावेळी, शरद पवार, अजित पवारांसह डॉ. अमोल कोल्हेंवरही टीका केली. तसेच, आम्ही शिवाजी महाराजांच्या भगव्याशी प्रामाणिक आहोत, आमची युती केवळ तुमच्यासाठी असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
''शिवाजीराव यांच्या सभेला आल्याशिवाय निवडणुकीची गंमत येत नाही. आता, चौकार, षटकार मारला पाहिजे, आयपीएलही सुरू आहे. खासदार हा तुमच्यासोबत राहून काम करणारा पाहिजे की नाटकात काम करणारा पाहिजे. आमच्या खासदारांनी केलेल्या कामांचे कट-पेस्ट विरोधक करत आहेत. आमचे पंतप्रधानांचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत. पण, त्यांच्याकडे एक नाव तरी आहे का? काँग्रेस आघाडीकडे बुडबुडे भरपूर आहेत, पण पंतप्रधानपदाचा चेहरा एकही नाही. पन्नास वर्षांमध्ये आम्ही भगवा बदलला, ना नेता बदलला. माझ्या मातेशी आणि मातीशी इमान राखणारा भगवा खांद्यावर घेतला आहे, असे म्हणत शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एक प्रसंगही सांगितला. तसेच अजित पवार यांच्यावरही नाव न घेता टीका केली. गेल्यावेळी धरण कोरडे पडले होते, त्या धरण्यात आम्ही काय...? तुम्हाला पटत असेल तर जरूर धरण भरून घ्या. दुष्काळ पडला तर त्या माणसाला धरणाच्या आसपास फिरून देऊ नका सावध रहा. असे म्हणत अजित पवारांच्या वक्तव्याची आठवण उद्धव ठाकरेंनी करुन दिली.
शिवाजी महाराजांचे काम करणारा म्हणून नाही, तर शरद पवारांचा उमेदवार म्हणून ये मग आम्ही पाहू, असे म्हणत कोल्हेंवर निशाणा साधला. लाज वाटते का ? असे आम्हाला विचारणारे यांचा कधी लाजेशी संबंध आला आहे का? शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षातील वाद खट्टा-मीठा होता. आम्ही शेतकऱ्यांसाठी आणि तुमच्यासाठी युती केलेली आहे. आपण आता पाकिस्तान दिसता कामा नये अशी कारवाई आपल्याला पुढे करायची आहे. सैनिकांच्या शौर्याचे भांडवल होता कामा नये. त्यांच्या शौर्यावर जगणारे आम्ही नाही. सर्जिकल स्ट्राइक आणि सैनिकांवर शंका घेऊ नका.