मुलींनो, नका भुलू ‘वरलिया रंगा!’
By Admin | Published: January 24, 2016 02:06 AM2016-01-24T02:06:38+5:302016-01-24T02:06:38+5:30
लग्नाचे आमिष दाखवणे..., प्रेमाच्या जाळ्यात ओढणे... सहानुभूती दाखवून मन जिंकणे... मला तुझी अतिकाळजी आहे, असे भासवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणे
पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवणे..., प्रेमाच्या जाळ्यात ओढणे... सहानुभूती दाखवून मन जिंकणे... मला तुझी अतिकाळजी आहे, असे भासवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणे, अशा घटनांमध्ये शहरात वाढ झाली आहे. त्यामुळे या अल्पवयीन मुलींचे समुपदेशन करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून या मुली घटनेच्या शिकार बनणार नाहीत.
शहरात दोन महिन्यांत अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या सहा घटना घडल्या आहेत. त्यामध्ये जास्त प्रकरणे ही लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची आहेत. त्या हेतूने तिच्यावर वारंवार एकटेपणाच्या संधीचा फायदा साधत, तसेच सामूहिकरीत्या बलात्कार केला जात आहे. चिंचवडमध्ये शुक्रवारी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता आहे.
शाळेत शिकत असताना मुलींना अनेक गोष्टींचे आकर्षण निर्माण होते. मुली-मुलींमध्येच ईर्ष्या उत्पन्न होते. त्या माध्यमातून स्पर्धा वाढते. सहावी ते सातवीपासूनच मुलींचा कुटुंबाशी संवाद हरवलेला असतो. कधी कधी घरातील भांडणे, कलह यांमुळे घरात विसंवाद निर्माण होतो. घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बाहेरील आकर्षणाला बळी पडण्याचे मुलींचे प्रमाण वाढले आहे. कुटुंबाच्या अशा वाईट परिस्थितीत आपल्याला समजून घेणारे, आपली काळजी (?) घेणारे कोणीतरी भेटले, की मुलीचे भान हरपून जाते. मुलाकडे असलेल्या दुचाकी, चारचाकी किंंवा हॉटेल, चित्रपट अशा मनोरंजनात्मक पैसे उडविण्याच्या फॅशनला ‘ती’ बळी पडते.
निगडी, चिखली, भोसरी, चिंचवड, लोणावळा आदी परिसरात अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले आहेत. काही मुलींना फूस लावली गेली आहे. तर काही मुलींना लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केले आहेत. खेळण्या-बागडण्याच्या वयात आपण काय करतोय याचे भानच त्यांना राहत नाही. अशा वेळी कुटुंबात संवाद कमी असणे हे मुख्य कारण आहे. त्यामुळे घराबाहेर पडल्यानंतर आपला पाल्य नेमका काय करतो, शाळा-महाविद्यालयाच्या वेळेतही विद्यार्थी बाहेर फिरत असतात. याबद्दल पालक अनभिज्ञ असतात. (प्रतिनिधी)
आपला पाल्य वेळेत घरी येत नसेल अथवा पैसे चोरी करण्याची सवय लागली असेल, तर अशा वेळी पालकांनी मुलांना जास्त सूट देता कामा नये. वेळीच अशा गोष्टींना आवर घालणे गरजेचे आहे. घरात खोटे बोलणे, विसंवाद असणे; जास्तीत जास्त वेळ मोबाइलवर बोलणे. सतत व्हॉट्स अॅप, फेसबुकवर असणे या गोष्टींना आळा घालणे गरजेचेच आहे.
पालकांनी मुलांना समजून घ्यावे
मुलींना स्पर्शातील चांगला-वाईटपणा कळणे गरजेचे आहे. याकरिता शाळास्तरांवरच मुलींना अशा गोष्टींचे आकलन होणे आवश्यक आहे. मुलींच्या, तसेच मुलांच्या वर्तणुकीतील बदल समजायला हवेत. शिक्षक, तसेच पालकांना विद्यार्थ्यांच्या वर्तनाची उकल असणे आवश्यक आहे. मात्र, मुलांच्या विकृतीत वाढ होत आहे, ही बाब गंभीर आहे.
- डॉ. धनंजय आष्टुरकर, मानसोपचार तज्ज्ञ
अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांत वाढ होत आहे. यासाठी नक्की कोणता वयोगट कारणीभूत आहे, हे पाहणे गरजेचे आहे. मात्र, पाशवी मनोवृत्तीत वाढ होत आहे, हे तितकेच खरे आहे. पालकांनी मुलांना वेळ देणे गरजेचे आहे. अशा घटना घडल्यास त्या विषयी मोकळेपणाने बोलू शकण्यासाठी कुटुंबात सुसंवाद असणे आवश्यक आहे.
-डॉ. किशोर गुजर, मानसोपचार तज्ज्ञ, वायसीएम रुग्णालय
महिला अत्याचार कमी होत आहेत. शाळा व महाविद्यालयांत जनजागृतीचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी टवाळखोरांचा टवाळपणा सुरू आहे, अशा ठिकाणी कारवाई सुरू आहे. मुलींच्या छेडछाडीच्या घटना आता प्रत्यक्षपणे समजतात. सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्याचे काम शाळांमध्ये केले आहे. मुलींनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
- योगिता कुदळे, महिला पोलीस समुपदेशक, पुणे
शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींसाठी अॅँटिरॅगिंग समिती स्थापन केली आहे. विद्यालयात सीसीटीव्ही कॅ मेरे बसविलेले आहेत. टवाळखोर मुलांना पोलिसांनी चांगले धडे शिकवायला हवेत. पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. विद्यालय सुटताना व भरताना अशा टवाळांवर कारवाई गरजेची आहे.
- अशोक पाटील, प्राचार्य, राजमाता जिजाऊ विद्यालय
शाळा-महाविद्यालय स्तरावर वारंवार पालक व शिक्षकांची बैठक होणे गरजेचे आहे. मुली खासगी बसने प्रवास करीत असतील, तर त्यावर नजर ठेवणे गरजेचे आहे. तसेच, पालकांनी सजग राहायला हवे. पालकांनी पाल्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. पाल्याशी नाते स्नेहाचे ठेवावे. स्वसंरक्षणाचे धडे पाल्याला देणे गरजेचे आहे.
- श्रद्धा जैन, उपप्राचार्य, ताराबाई शंकरलाल मुथा विद्यालय
मुलींना स्वसंरक्षण आवश्यक आहे. इतरांवर अवलंबून न राहता तिला संकटाशी सामना करता यायला हवा. असे प्रकार घडल्यास न घाबरता पोलिसांत संपर्क करणे आवश्यक आहे. तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये अनेक प्रकारच्या कार्यशाळा व चर्चासत्र या विषयांवर होणे आवश्यक आहे. - संगीता प्रधान, महिला दक्षता समिती, सदस्य