डीजेचा होतो हृदयाला त्रास, मंडळांना परवानगी नको : ग्रामपंचायत व पोलिसांना अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 01:42 PM2019-06-08T13:42:38+5:302019-06-08T13:43:30+5:30

२५ दुकानदारांनी एकाच जागेवर डीजे व लेझर लाइट लावण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडे केली आहे. 

Do not get permission to dj because health issues | डीजेचा होतो हृदयाला त्रास, मंडळांना परवानगी नको : ग्रामपंचायत व पोलिसांना अर्ज

डीजेचा होतो हृदयाला त्रास, मंडळांना परवानगी नको : ग्रामपंचायत व पोलिसांना अर्ज

googlenewsNext
ठळक मुद्दे२५ व्यापाऱ्यांचा एकत्रितपणे विरोध 

लोणी काळभोर : डीजेच्या अतिआवाजाने व मोठ्या आवाजाच्या हादऱ्याने हृदयाला त्रास होतो, छाती दुखू लागते. तसेच सर्वोच्च न्यायालयाने आवाजावर नियंत्रण ठेवावे, असे आदेश देऊनही डीजे लावले जातात, यास कंटाळून लोणी काळभोर येथील जुनी अंबरनाथ भाजी मंडई परिसरातील एकूण २५ दुकानदारांनी या भागात एकाच जागेवर डीजे व लेझर लाइट लावण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी एका अर्जाद्वारे ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडे केली आहे. 
लोणी काळभोर येथील जुनी अंबरनाथ भाजी मंडई परिसरात मुख्य रस्त्यालगत स्टेशनरी- कटलरी, किराणा, कासार, स्वीट होम, भांडी, फोटो स्टुडिओ, फोटो फ्रेम, लेडिज शॉपी, टेलर, कपडे, झेरॉक्स, हॉटेल आदी दुकाने तसेच दाट लोकवस्ती आहे. आजकाल डीजेचे फॅड असल्याने कोणताही उत्सव, जयंती, वाढदिवस व इतर कोणतेही कार्यक्रम असले तरी डीजे लावला जातो. 
कार्यक्रम मळ्यात अथवा गावात साजरा करण्यात येतो तरी डीजे व लेझर लाईट मात्र अंबरनाथ भाजी मंडई नजीक वर्दळीच्या ठिकाणीच लावला जातो. मोठ्या आवाजातून निर्माण होणाऱ्या मोठ्या कंपनामुळे एकतर ग्राहक फिरकत नाहीत व दुकानातील वस्तू खाली पडतात. फर्निचरच्या काचा तुटतात, झेरॉक्स व इतर मशिन बंद पडतात. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. लेझर लाईटमुळे डोळ्यांसमोर अंधारी येण्याचे आजार जडतात. 
हे कार्यक्रम आयोजित करणारे एकतर राजकीय पुढारी अथवा त्यांचे कार्यकर्ते असतात. त्यामुळे पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अथवा सहायक पोलीस निरीक्षक यांना बोलावून त्यांचा सत्कार केला जातो. अधिकारी निघून गेले की मोठ्या आवाजात डीजे सुरू होतो. 
डीजे केवळ वाजतच नाही तर चांगले हादरे देऊन जातो. यामुळे परिसरात वास्तव्यास असणाºया नागरिकांना डोके, छातीत दुखणे याबरोबरच ऐकू न येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे या त्रासास सामोरे जावे लागते. परिणामस्वरूप त्यांना डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते, अशा तक्रारी सर्वत्र ऐकायला मिळत आहेत. याचबरोबर या आवाजाच्या हादऱ्यांचा परिणाम घरावरील 
लोखंडी पत्रे, कौले यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. त्याचा त्रास ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, नवजात बालके व लहान मुलांना होतो. काही डीजेचा आवाज तर एवढा भयानक असतो की, तो ऐकून कसला हा आवाज, असे म्हणण्याची व त्या आवाजापासून दूर जाण्याची धडपड सुरू होती. डॉक्टर मंडळींचेही डीजेवर नियंत्रण असायलाच हवे, त्याच्या मोठ्या आवाजाचे वाईट परिणाम लोकांना भोगावे लागतात, असे म्हणणे आहे. आवाजाने उत्सव साजरा करावा. पण त्याचा त्रास होणार नाही. प्रकृतीवर परिणाम होणार नाही, याची काळजीही मंडळांनी घ्यायला हवी. पोलिसांचे ही त्याकडे दुर्लक्ष होते. नियंत्रणाहून अधिक आवाज ठेवणाऱ्या डीजेवाल्यांवर दंडात्मक व त्वरित कारवाई व्हायला हवी, तरच हा अप्रकार बंद होणार, असे या दुकानदार व नागरिकांचे सार्वत्रिक मत आहे. एखादा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला तर पोलिसांनी दिलेल्या परवानगीमध्ये आवाजावर मर्यादा असावी, असे नमूद केले जाते.
तो कार्यक्रम रात्री १० नंंतर सुरू राहिला तर पोलीस हस्तक्षेप करून तो बंद करण्याचा आदेश देतात. यामुळे श्रोते नाराज होऊन घरी परततात. तेच पोलीस सर्वोच्च न्यायालयाने बंदीचा आदेश देवूनही डीजेवर मेहरबान का? हा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
..........
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर लोणी काळभोर पोलीस ठाणे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पोलीस ठाण्याचे वतीने कोणासही मोठ्या आवाजात डीजे लावण्याची परवानगी देण्यात येत नाही. 
यापुढील काळात नियमांचे उल्लंघन होत आहे, हे निदर्शनास आले तर डीजे जप्त करून चालक, मालक व मंडळाचे पदाधिकारी यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करणार आहोत. तशा सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. 

Web Title: Do not get permission to dj because health issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.