अमली पदार्थाच्या आहारी जाऊ नका : प्रतिभा पाटील; डी. वाय. पाटील विद्यापीठात पदवीप्रदान समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 03:39 PM2018-01-19T15:39:52+5:302018-01-19T15:45:49+5:30
विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या आहारी जाऊन स्वत: चे व कौटुंबाचे जीवन अस्थिर करू नये, असा सल्ला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला. डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या दुसऱ्या पदवी प्रदान समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.
पुणे : प्रत्येक विद्यार्थ्याला रँगिंगमुक्त वातावरणात शिक्षण घेता आले पाहिजे. त्यामुळे शैक्षणिक संस्थेने विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. तसेच विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या आहारी जाऊन स्वत: चे व कौटुंबाचे जीवन अस्थिर करू नये, असा सल्ला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.
डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या दुसऱ्या पदवी प्रदान समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील , डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील, डॉ. अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला आणि कायद्याचे अभ्यासक हुकम चंद शर्मा यांना उल्लेखनीय कायार्साठी पाटील यांच्या हस्ते डी. लिट. देवून सन्मानित करण्यात आले.
प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर विद्यार्थ्यांच्या जीवनात उत्तम बदल घडवून आणण्याचे ध्येय ह्या विद्यापीठाने फार अल्प कालावधीत साध्य केले. हे अतिशय कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील संशोधन करण्याकडे लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे आपल्या क्षमता व गुणवत्तेचे रुपांतर स्वत: च्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी करावे.
विद्यापीठची शैक्षणिक गुणवत्ता राखण्याबरोबरच सामाजिक भावनेतून विद्यापीठासाठी काम करत राहणार असल्याचे नमूद करून डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. एकनाथ खेडकर यांनी विद्यापीठाचे यश, योजना आणि नवनवीन उपक्रमांची महिती दिली. तसेच पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमात अंकिता सुदा, श्रद्धा केळकर, आशिष घनश्याम र्ब्वे, तेजस माणिक, अक्षय भोसले, मोहद जाहिद या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देण्यात आले.