मुद्द्याला बगल नको, सुळेंंची कामे दाखवा : शिवतारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 02:35 AM2018-12-11T02:35:25+5:302018-12-11T02:36:33+5:30
कामाच्या मुद्द्याला बगल देऊन वैयक्तिक शेरेबाजी करण्याऐवजी सुळे यांनी कामे दाखवावित असा खोचक टोला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी लगावला.
सासवड : मागील चार वर्षांत पुरंदर तालुक्याने विकास प्रक्रियेत चांगली कामगिरी केलेली आहे. तालुक्याचा चेहरामोहरा हळूहळू बदलू लागला आहे. बारामती घडायला ५० वर्षं पवार कुटुंबाला राजकारण करावे लागले. पुरंदर-हवेली मतदारसंघ अवघ्या नऊ वर्षांत त्या दिशेने आगेकूच करताना पाहून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या भवितव्याच्या चिंतेने घेरले आहे. कामाच्या मुद्द्याला बगल देऊन वैयक्तिक शेरेबाजी करण्याऐवजी सुळे यांनी कामे दाखवावित असा खोचक टोला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी लगावला.
रावडेवाडी (गराडे) येथे खर्चाच्या पाझर तलाव भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी कार्यक्रमाला सभापती अर्चना जाधव, माजी सभापती अतुल म्हस्के, दादा घाटे, उपसभापती दत्तात्रय काळे,जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, शालिनीताई पवार, ज्योती झेंडे, पंचायत समिती सदस्य रमेश जाधव, नलिनी लोळे, शाखाप्रमुख भास्कर जाधव, सदाशिव रावडे, गणेश रावडे, दादा रावडे, उल्हास जगदाळे उपस्थित होते. या वेळी माजी उपसरपंच बाळासाहेब रावडे, विशाल रावडे, सागर रावडे, शांताराम रावडे, संजय रावडे, पांडुरंग जगदाळे, प्रमोद फडतरे, भाऊसाहेब रावडे, म्हस्कु रावडे, रामदास रावडे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला.
राष्ट्रीय महामार्ग, ग्रामसडक योजनेतून होत असलेला ग्रामीण रस्त्यांचा कायापालट, जलसंधारणातील विक्रमी यश, जेजुरीतील भव्य ग्रामीण रुग्णालय, आरटीओ सुविधा, सिमेंट बंधाऱ्यांचे जाळे, पुरंदर उपसा आणि जनाईचे अवघ्या १९ टक्के शुल्कात मिळणारे पाणी या व अशा अनेक कामांमुळे पुरंदर तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादी सैरभैर झालेली आहे. विमानतळाच्या मुद्द्यावर दोनही पक्षांना अजुन निश्चित भूमिका ठरवता आलेली नाही. तेच आता तालुक्याच्या विकासाच्या गप्पा मारत आहेत. त्यांना खासदार सुळे यांची कामे दाखवा म्हटल्यावर राग येतो. यांच्या कामावर सेल्फी काढावेत आणि जनतेला दाखवावेत असेही शिवतारे म्हणाले.