बेडच्या त्रुटीचा ‘नियोजना’ला अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2016 12:46 AM2016-01-06T00:46:29+5:302016-01-06T00:46:29+5:30
तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १६ गावांचा समावेश असून, साधारण १ लाख लोकसंख्या असतानाही फक्त सहा बेडची व्यवस्था
तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १६ गावांचा समावेश असून, साधारण १ लाख लोकसंख्या असतानाही
फक्त सहा बेडची व्यवस्था
असल्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेला येणाऱ्या लाभार्थींची गैरसोय होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, पारोडी, धानोरे, निमगाव म्हाळुंगी, कोंढापुरी, सणसवाडी, कोरेगाव भीमा, कासारी, शिवतक्रार, म्हाळुंगी, टाकळी भीमा, बुरंजवाडी, दरेकरवाडी, वाडा पुनर्वसन, शिक्रापूर, डिंग्रजवाडी या १६ गावांचा समावेश आहे.
सुमारे १ लाख लोकसंख्या आहे. तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून अवघे सहा बेडच्या व्यवस्थेचेच आहे. या बेडच्या संख्येनुसार दर आठवड्याच्या कुटुंब नियोजनाच्या कॅम्पमध्ये फक्त सहाच शस्त्रक्रिया घेतल्यास वर्षाला अवघ्या २८८ होतील.
या बेडच्या संख्येनुसार शस्त्रक्रिया केल्यास उद्दिष्टपूर्ती तर होणार नाहीच. अनेक लाभार्थी प्रतीक्षा यादीत राहतील. जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या बेडच्या समस्या हे वास्तव आहे.
तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात बेडच्या संख्येनुसार किंवा जास्त कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या गेल्या तरीही या लाभार्थींच्या शस्त्रक्रियेपूर्वी, शस्त्रक्रियेदरम्यान व नंतर त्यांची शारीरिक काळजी आरोग्य खाते घेत असते. त्यांना आर्थिक लाभही जातो, असे वैद्यकीय अधिकारी प्रज्ञा घोरपडे यांनी सांगितले. त्यामुळे लाभार्थींनी बेडचा विचार न करता कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया २ अपत्यानंतर स्त्री किंवा पुरुषांनी मोफत शासकीय आरोग्य केंद्रात करून घेण्याचे आवाहन डॉ. घोरपडे यांनी केले आहे.
(वार्ताहर)