‘साहेब मारू नका, मीच खून केलाय’, फिर्यादीच निघाला आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 01:43 IST2020-02-20T01:43:17+5:302020-02-20T01:43:44+5:30
फिर्यादीच निघाला आरोपी : वडगाव मावळला ट्रकचालकाचा खून

‘साहेब मारू नका, मीच खून केलाय’, फिर्यादीच निघाला आरोपी
वडगाव मावळ : ट्रकमध्ये स्वयंपाक करीत असताना किरकोळ वादातून एका ट्रकचालकाने दुसरा सहकारी चालकाच्या छातीवर कांदा कापण्याच्या सुरीने वार केले. यात त्याचा मृत्यू झाला. वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-पुणे महामार्गावर वडगाव-तळेगाव फाटा येथे बुधवारी (दि. १९) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.
बांकेलाल जयनारायण ओझा ऊर्फ गौडा (वय ३८, रा. बामनेर, जि. मुरणा, मध्यप्रदेश) असे खून झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा सहकारी चालक राकेश जगजितसिंग यादव (वय ४४, रा. बामनेर, जि. मुरणा, मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांकेलाल व यादव हे दोघे त्यांचा मुंबईकडून ट्रक अहमदनगरकडे घेऊन जात होते. वडगाव-तळेगाव फाट्यावर त्यांनी ट्रक थांबविला. त्यावेळी स्वयंपाक करताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. यात बाचाबाची झाल्याने यादव याने बांकलाल याच्या छातीवर कांदा कापण्याच्या सुरीने वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने बांकेलाल याचा मृत्यू झाला. घटनेनंतर राकेश यादव पोलिसांकडे गेला. माझा सहकारी चालक बांकेलाल याचा कोणीतरी खून केला आहे, असे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना संशय आल्याने त्यांनी याबाबत अधिक चौकशी सुरू केली. उपनिरीक्षक दिलीप देसाई, विश्वास आंबेकर, कविराज पाटोळे, मनोज कदम, गणेश तावरे, अमोल गवर यांनी यादव याच्याकडे अधिक सखोल चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच यादव याने गुन्हा कबूल केला. साहेब मारू नका, मीच खून केला आहे, असे त्याने सांगितले. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.