‘डावे’ असे लेबल लावू नये - सुनिल शानबाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 01:52 AM2018-08-31T01:52:32+5:302018-08-31T01:53:44+5:30
सुनील शानबाग : ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गौरव
पुणे : कुणालाही सहजपणे ‘माओवादी’,‘देशद्रोही’,‘डावे’ अशी लेबल लावली जातात. बोलणं खूप सोपं आहे, कोणताही पुरावा आणि आधार नसताना कुणालाही आरोपी समजले जाते. कुणाला जरी पकडले गेले किंवा एखाद्याबद्दल काही जरी छापले गेले तरी आमच्यासारख्यांनाच प्रश्न विचारले जातात हे खूप बेजबाबदारपणाचे आहे, अशा शब्दांत विख्यात रंगकर्मी सुनील शानबाग यांनी सरकारवर टीका केली.
गेली चार दशके हिंदी, इंग्रजी व मराठी प्रायोगिक रंगभूमीवर अखंड आणि अथकपणे कार्यरत असणाऱ्या सुनील शानबाग यांना नाट्यक्षेत्रातील प्रदीर्घ कामगिरीसाठी यंदाचा ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानच्या वतीने शानबाग यांचा प्रसिद्ध लेखिका शांता गोखले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, ज्येष्ठ लेखिका अरुंधती घोष आणि प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय विश्वस्त अशोक कुलकर्णी उपस्थित होते. या सत्कार सोहळ्यानंतर ‘लोकमत’शी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ऐतिहासिक काळापासून ही विचारांच्या विरोधाची लढाई चालत आली आहे, त्यात नवीन असे काहीच नाही. पण या विचारांना कशा पद्धतीने सामोरे जातो हे महत्त्वाचे आहे. त्या व्यक्तीबरोबर चर्चा करणार की नुसते त्या व्यक्तीच्या विचारांना दाबण्याचा प्रयत्न करणार हे पाहायले हवे. यासाठी अधिकाधिक संवाद घडण्याची गरज आहे. वर्षानुवर्षे कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाले होतच आहेत, कधीतरी त्याची तीव्रता अधिक तर कधी कमी दिसली आहे. सध्याच्या काळात हे जास्त दिसत आहेत इतकेच आहे. मात्र याही परिस्थितीत आपण आपले काम आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणे करीत राहिले पाहिजे असा कानमंत्रही त्यांनी कलाकारांना दिला.
सत्कारानंतर शानबाग यांनी ‘अवर थिएटर’ याविषयावर भाष्य केले. नाटक किंवा दिग्दर्शन करणे हे एकट्याचे काम नाही. हे एक टीम वर्क आहे. रंगभूमीला आज आधाराची गरज आहे. रंगभूमीकडे विकासाच्या प्रोजेक्टच्या रूपात पाहिले तर रंगभूमीचा विस्तार होऊ शकत नाही. काही मोठ्या कंपन्या रंगभूमीला सहकार्य करीत असल्या तरी त्या स्वत:चा ब्रँंड निर्माण करत आहेत. यातून रंगभूमी टिकू शकत नाही. कॉर्पोरेट कंपन्यांचा रस संपला की त्या अंग काढून घेतात तेव्हा नाटक कंपन्या काय करणार? अशा परिस्थितीत पैशांची आस न धरता नाटक करणाºया कलाकारांच्या छोट्या गटांना मोठ्या नाट्यसंस्थांनी सहकार्य करण्याची गरज आहे. अगदी माफक दरात रंगीत तालमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यापासून ते मर्यादित प्रेक्षकसंख्येसमोर नाटक सादर करता येईल अशा रंगमंचापर्यंत ही मदत करता येईल. वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा स्वरूपाची व्यवस्था उभी राहिली तरच त्यातून रंगभूमी जिवंत राहील.
घोष म्हणाल्या, संघर्ष आणि प्रयोगशीलता ही सुनीलच्या नाटकांची वैशिष्ट्ये आहेत. स्वत:चा विषय समजून घेण्यासाठी संशोधनाची वृत्ती त्याच्यात सापडते. त्याच्या नाटकातून अव्यक्त शब्द आणि ध्वनीसुद्धा अधोरेखित होतो. एखादे नाटक चालले नाहीतर अनेक कलाकारांच्या मनात अपयशाची भावना येते पण सुनील अपयशानंतर वेगळ्या दृष्टिकोनातून पाहातो. रूपाली वैद्य यांनी सूत्रसंचालन केले.