भारतीय सैन्यदलाकडे केवळ नोकरी म्हणून पाहू नका- लष्करप्रमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 02:42 AM2018-12-14T02:42:35+5:302018-12-14T02:42:49+5:30
जर भारतीय लष्करात दाखल व्हायचे असेल, तर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत असायला हवे. मनोबल उंच हवे. प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी असायला हवी, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केले.
पुणे : भारतीय सैन्यदलाकडे आजचे तरुण केवळ नोकरी म्हणून बघतात. हा दृष्टिकोन अतिशय चुकीचा आहे. जर भारतीय लष्करात दाखल व्हायचे असेल, तर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत असायला हवे. मनोबल उंच हवे. प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी असायला हवी, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केले.
लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे युद्धात, तसेच सीमेवर शत्रूंशी लढताना विकलांग झालेल्या देशभरातील जवळपास ६०० सैनिकांचा सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. जनरल बिपिन रावत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला, या वेळी ते बोलत होते.
रावत म्हणाले, लष्करात दाखल होण्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी अनेक तरुण माझ्याकडे येतात. या वेळी लष्करात नोकरी कशी मिळवायची असे ते विचारतात. या वेळी त्यांचा दृष्टिकोन चुकीचा असल्याचे सांगतो. लष्करात दाखल होण्यासाठी मोठे मनोबल लागते. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी असावी लागते. जिथे रस्ता मिळत नाही, त्या ठिकाणी स्वत: रस्तानिर्मिती करण्याची क्षमता असायला हवी, तरच खऱ्या अर्थाने तुम्ही सैनिक होऊ शकता. तुम्हाला नोकºया हव्या असतील, तर रेल्वे किंवा इतर ठिकाणी जा. स्वत:चा व्यवसाय सुरू करा; पण भारतीय सैन्यात यायचे असेल, तर मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत असणे आवश्यक आहे. कठीण आणि अडचणीच्या ठिकाणी काम करण्याचा आत्मविश्वास असल्यास सैन्यात तुमचे स्वागत आहे.
लष्करी सेवेत काम करत असताना देशभरातील नेमक्या किती सैनिकांना अपंगत्व आले आहे आणि सध्या ते कशाप्रकारे जगत आहे. तसेच त्यांना दैनंदिन आयुष्यात कोणत्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे याबाबत भारतीय लष्करातर्फे काही अधिकारी ब्रँड अॅम्बेसिडर बनवून त्यांच्याद्वारे वर्षभरात विविध ठिकाणच्या सैनिकांचा आढावा घेतला जाणार आहे.
६०० सैनिकांचा लष्करप्रमुखांनी केला सत्कार
भारतीय सैन्याने २०१८ हे वर्ष विकलांग सैनिकांना समर्पित केले आहे. यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी जनरल रावत यांंनी स्वत: प्रत्येक विकलांग सैनिकाजवळ जाऊन त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा सत्कार केला.
स्वत: लष्करप्रमुखांनी जवळ येऊन सत्कार केल्यामुळे अनेक सैनिकांचे डोळे पाणावले.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी अधिकारी भारावले
या वेळी विकलांग जवानांनी देशभक्ती गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या गाण्यांमध्ये सैन्याचे जीवन त्यांनी अधोरेखित केले.
याचबरोबर अतिशय कठीण असे टँक फॉर्मेशन तसेच अवघड न्यृत्य व्हीलचेअरवर विकलांग सैनिकांनी सादर केले. यामुळे उपस्थित सर्व अधिकारी भारावून गेले.
विकलांग सैनिकांना यापुढील काळात कशाप्रकारे मदत देता येईल यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. अशा सैनिकांना वित्तीय मदत ही मिळावी याकरिता कॉर्पाेरेट कंपन्यांनाही सोबत घेतले जात असल्याची माहिती लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिली. विकलांग सैनिकांना मदत करणे हे भारतीय लष्कराचे कर्तव्य असून, ते यापुढील काळातही केले जाईल असे ते यावेळी म्हणाले.