नाटक स्वरूपात चित्रपट मांडू नये, सुबोध भावे यांचा निर्मात्यांना कानमंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 04:02 AM2018-05-06T04:02:42+5:302018-05-06T04:02:42+5:30
साहित्यासोबतच मराठी नाटकांवर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती झाली; परंतु नाटकाचे चित्रपटात रूपांतर करताना, नाटकाच्या कथेचे चित्रपटात रूपांतर करणे अपेक्षित असते. नाटकात जे दाखवले गेले तेच चित्रपटात पाहायला मिळेल, अशा समजुतीमध्ये प्रेक्षक चित्रपट पाहायला येत असतील तर मराठी प्रेक्षकांमध्ये ही चुकीची संकल्पना रुजली आहे. निर्मात्यांनी देखील नाटकच चित्रपट स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करू नये, असा कानमंत्र अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे यांनी निर्मात्यांना दिला.
पुणे - साहित्यासोबतच मराठी नाटकांवर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती झाली; परंतु नाटकाचे चित्रपटात रूपांतर करताना, नाटकाच्या कथेचे चित्रपटात रूपांतर करणे अपेक्षित असते. नाटकात जे दाखवले गेले तेच चित्रपटात पाहायला मिळेल, अशा समजुतीमध्ये प्रेक्षक चित्रपट पाहायला येत असतील तर मराठी प्रेक्षकांमध्ये ही चुकीची संकल्पना रुजली आहे. निर्मात्यांनी देखील नाटकच चित्रपट स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करू नये, असा कानमंत्र अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे यांनी निर्मात्यांना दिला.
संवाद पुणे आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा पुणे यांच्यातर्फे आयोजित ‘संवाद मराठी चित्रपटांचा’ या मराठी चित्रपट संमेलनानिमित्त राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आयोजित दोन दिवसीय ‘ऋणानुबंध’ या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम; तसेच संवाद पुणेचे प्रमुख सुनील महाजन, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, राजू कावरे, वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार उपस्थित होते. भावे म्हणाले की, नाटक हे माध्यम वेगळे आहे आणि चित्रपट हे वेगळे माध्यम आहे. नाटकाचे चित्रपटात रूपांतर करताना त्या चित्रपट दिग्दर्शकाला किंवा निर्मात्याला त्या नाटकाच्या चित्रपटाच्या दृष्टिकोनातून नक्की कोणता दुसरा आयाम दिसतो आणि तो आयाम तो कसा मांडतो हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे.
सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले, तर निकिता मोघे यांनी आभार मानले.
मराठी चित्रपट महोत्सवांनी
महाराष्ट्राच्या सीमा ओलांडाव्यात
महाराष्ट्राबाहेर गुजरात, मध्य प्रदेश अशा विविध राज्यात आणि शहरांतदेखील मराठी लोकांची संख्या खूप आहे. एवढेच नव्हे, तर भारताबाहेर देखील विविध देशांमध्ये मराठी भाषिकांचा टक्का वाढत आहे. अशा परिस्थितीत चित्रपट महोत्सव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून छोट्या-मोठ्या स्वरूपात चित्रपट महोत्सवांचे आयोजन केले जावे, अशी अपेक्षा सुबोध भावे यांनी व्यक्त केली.