न घडलेल्या अपघाताचा थरार, रुग्णवाहिका-पीएमपीची धडक टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 03:18 AM2017-08-04T03:18:45+5:302017-08-04T05:37:09+5:30

एका न घडलेल्या अपघाताचा थरार पाहून प्रत्यक्षदर्शींच्या अंगावर शहारे आले. थोडक्यात चुकलेल्या या अपघाताचे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

 Do not miss the tragedy of ambulance-PMP of accident | न घडलेल्या अपघाताचा थरार, रुग्णवाहिका-पीएमपीची धडक टळली

न घडलेल्या अपघाताचा थरार, रुग्णवाहिका-पीएमपीची धडक टळली

Next

पुणे : एका न घडलेल्या अपघाताचा थरार पाहून प्रत्यक्षदर्शींच्या अंगावर शहारे आले. थोडक्यात चुकलेल्या या अपघाताचे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गामध्ये विरुद्ध बाजूने घुसलेली रुग्णवाहिका आणि भरधाव येणारी पीएमपी यांची धडक बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे चुकली; अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
प्रत्यक्षदर्शी सामाजिक कार्यकर्ते रामविलास माहेश्वरी यांनी दिलेल्या माहितीनुसार : गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ते राव हॉस्पिटलमधून बाहेर पडत होते. त्या वेळी कात्रजकडून स्वारगेटच्या दिशेने जात असलेली एक रुग्णवाहिका बीआरटी मार्गामधून भरधाव येत होती. सातारा रस्त्यावरील नातूबाग चौकामधून ही रुग्णवाहिका बीआरटीच्या विरुद्ध बाजूच्या लेनमध्ये घुसली. चौकामध्ये उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांनी चालकाला इशारा करून चुकीच्या मार्गिकेमधून जात असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र वेगात असलेला चालक तसाच गाडी दामटत पुढे गेला.
दरम्यान, बिबवेवाडी कॉर्नरवरील पुष्पमंगल चौकातील स्वारगेटकडून कात्रजकडे जाणारा सिग्नल सुटला. सिग्नलला उभ्या असलेल्या तीन पीएमपी बसेस एकापाठोपाठ भरधाव वेगात बीआरटी मार्गामधून पुढे निघाल्या होत्या. राव हॉस्पिटलसमोरच उलट्या दिशेने भरधाव आलेली रुग्णवाहिका आणि सरळ जात असलेल्या पीएमपी बसमध्ये अत्यंत कमी अंतर राहिले होते. पीएमपी बसचालकाने करकचून ब्रेक दाबून बस जागेवरच थांबविली. अचानक ब्रेक दाबल्याने झटका खात बस थांबली. बसमधील प्रवाशांना क्षणभर काय झाले तेच समजले नाही. दरम्यान, रुग्णवाहिका चालकानेही गाडी थांबविली.
दोन्ही वाहनांच्या ब्रेकचा आवाज ऐकून आसपासच्या लोकांच्या पोटात गोळा आला. सर्व जण बीआरटी मार्गाच्या दिशेने धावले. सुदैवाने दोन्ही वाहनांची धडक झाली नाही. रुग्णवाहिकेमध्ये रुग्ण आणि त्याचे नातेवाईकही होते. तीन पीएमपी बस मागे घेणे शक्य नसल्याने रुग्णवाहिकेला पुन्हा पाठीमागे जावे लागले. बीआरटी मार्गामध्ये वळण घेता येत नसल्याने रिव्हर्स गिअरमध्येच रुग्णवाहिका अर्धा किलोमीटर मागे नेऊन पुन्हा योग्य मार्गिकेमधून बाहेर काढण्यात आली. थोडक्याच बचावलेल्या या अपघाताची चर्चा बराच वेळ परिसरात सुरु होती.

Web Title:  Do not miss the tragedy of ambulance-PMP of accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.