नदीसुधार नको; नदीसुरक्षा हवी

By admin | Published: July 6, 2017 03:45 AM2017-07-06T03:45:30+5:302017-07-06T03:45:30+5:30

मुळा व मुठा या नद्या पुण्याला निसर्गाकडून मिळालेली देणग्या आहेत. त्यांच्यासाठी आधुनिक पद्धतीने सुधार योजना राबवणे चुकीचे आहे

Do not reform the river; River security | नदीसुधार नको; नदीसुरक्षा हवी

नदीसुधार नको; नदीसुरक्षा हवी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुळा व मुठा या नद्या पुण्याला निसर्गाकडून मिळालेली देणग्या आहेत. त्यांच्यासाठी आधुनिक पद्धतीने सुधार योजना राबवणे चुकीचे आहे. त्यात या नद्यांच्या नैसर्गिक सौंदर्याची हानी होण्याची भीती ख्यातनाम जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी त्यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे महापालिकेच्या नदीसुधार प्रकल्पास असलेला विरोध नोंदवला.
या बैठकीनंतर निवडक पत्रकारांशी बोलताना राजेंद्रसिंह यांनी या प्रकल्पाविषयी आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, देशात सर्वत्र सध्या साबरमती नदीसुधार प्रकल्पाच्या धर्तीवर स्थानिक नद्यांच्या सुधारणेचे वारे वाहत आहे. त्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च केले जात आहेत. मात्र, साबरमती व अन्य नद्या यांच्या नैसर्गिक स्थितीत फरक आहे ही गोष्ट लक्षात घेतली जात नाही. मुळा व मुठा या नद्यांमध्ये बांधकाम होणार नाही, पात्र लहान होणार नाही, पाणी वाहते राहील याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे आयुक्तांना सांगितले असल्याची माहिती राजेंद्रसिंह यांनी दिली.
महाराष्ट्रातील नद्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे वाहणे, नदीकाठ, तेथील वसाहती या सर्वांमध्ये संस्कृती दडलेली आहे. स्थानिक प्रशासनाने त्यात सांडपाणी सोडून पुण्यातील नद्यांचे वैशिष्ट्य मोडीत काढले आहे. ते परत कसे मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. नदीसुधार प्रकल्पात ते होणे शक्य नाही. पैशांना व नदीकाठी वेगळीच संस्कृती विकसित करण्याला या प्रकल्पात भर दिला आहे. त्यात नद्यांचे संवर्धन होण्याची शक्यता नाही, उलट स्थिती आणखी खराब होण्याची चिन्हे आहेत, असे मत राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले.
नदीपात्रातून मेट्रो जाणार आहे, त्यामुळे तर पात्राचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे, असे राजेंद्रसिंह म्हणाले. आयुक्तांना या सर्व गोष्टींची कल्पना दिली आहे. पुणेकर नागरिकांनी नद्या या आपल्या शहराच्या जीवनवाहिन्या आहेत हे लक्षात घेऊन त्यांची हानी होणार नाही याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन राजेंद्रसिंह यांनी केले.

Web Title: Do not reform the river; River security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.