ऑनलाईन व्यवहाराला फसवणुकीचे ग्रहण, ओटीपी कोणालाही शेअर करू नका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 07:20 AM2019-11-25T07:20:11+5:302019-11-25T07:20:58+5:30
ग्राहकांना हव्या असणाऱ्या वस्तूची माहिती मिळावी, ज्यांना दुकानात प्रत्यक्षात येऊन वस्तू खरेदी करणे शक्य नाही अशा ग्राहकांनी आॅनलाईन त्या वस्तू खरेदी कराव्यात, याबाबत कुठलीही शंका असल्यास थेट दुकानाच्या मालकाशी संपर्क साधावा, अशी योजना गुगलकडून व्यापाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- युगंधर ताजणे
पुणे : ग्राहकांना हव्या असणाऱ्या वस्तूची माहिती मिळावी, ज्यांना दुकानात प्रत्यक्षात येऊन वस्तू खरेदी करणे शक्य नाही अशा ग्राहकांनी आॅनलाईन त्या वस्तू खरेदी कराव्यात, याबाबत कुठलीही शंका असल्यास थेट दुकानाच्या मालकाशी संपर्क साधावा, अशी योजना गुगलकडून व्यापाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, एका महाभागाने चक्क दुकानाच्या नावाने बनावट दूरध्वनी क्रमांक संबंधित दुकानाच्या संकेतस्थळावर टाकून ग्राहकांना फसविण्यास सुरुवात केली. एकाला दहा हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. ग्राहकांनी फसवणूक होत असल्याची तक्रार केल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला.
आॅनलाईनच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे फसवणुकीचे सत्र सुरू असून त्याला आळा घालण्यात तसेच त्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस प्रशासनाला म्हणावे असे यश येत नसल्याचे दिसून आले आहे. पुण्यात दररोज किमान चार ते पाच आॅनलाईनसंबंधी गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण आहे. आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार कार्ड तसेच बँक खाते यातून अनेक तक्रारी सायबर पोलिसांकडे दाखल होत आहेत. दुसरीकडे बनावट कस्टमर केअर क्रमांकाद्वारेदेखील नागरिकांच्या फसवणुकीत वाढ झाली आहे. दुसºया मोबाईल क्रमांकावरून फोन करून त्या एसएमएसद्वारे नागरिकांना लाखो रुपयांचे आमिष दाखवून त्यांना ओटीपी शेअर करण्यास नागरिकांना भाग पाडले जात आहे. बँकिंग, मोबाईल, खरेदी-विक्री यासारख्या विविध प्रकारे हॅकर्सने नागरिकांना गंडा घालत त्यांच्या डोकेदुखीत वाढ केली आहे. इतकेच नव्हे तर शॉपिंग, विवाह, खाद्यपदार्थ यांची माहिती देणाºया संकेतस्थळवार बनावट कस्टमर केअर क्रमांक टाकून ग्राहकांची फसवणूक केली जाते. कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास आम्हाला फोन करावा, अशी सूचना करून त्यांची बँकविषयक माहिती गोळा करण्यात येते. ग्राहक आमिषांना आणि भूलथापांना बळी पडतात आणि सहजच हॅकर्सच्या तावडीत सापडतात. बनावट क्रमांकावर फोन केल्यानंतर हुबेहूब एखाद्या कस्टमरसारखा संवाद करून ग्राहकांना आकर्षित करण्याचे काम केले जाते. अगोदरच बँकविषयक डिटेल्स घेतले असल्याने केवळ ओटीपी क्रमांक शेअर करण्यास सांगण्यात येते. एकदा का ग्राहकाच्या खात्यातून पैसे दुसरीकडे ट्रान्सफर झाल्यानंतर संबंधित दूरध्वनी क्रमांक ‘आऊट आॅफ कव्हरेज’ असल्याचे सांगण्यात येते.
काय करावे लागेल...?
काहीही झाल्यास आपला ओटीपी कुणालाही शेअर करू नये? कोणत्याही प्रकारची आॅनलाईन फसवणूक झाल्यास संबंधित कंपनी, बँक आणि सायबर पोलिसांना त्याची तातडीने माहिती द्यावी.
ओटीपी क्रमांक दुसºया कुणास शेअर करणे म्हणजे आपली फसवणूक झालेली आहे, असे समजणे. तसेच, कुठल्याही प्रकारच्या व्यवहारात यूपीआय पीन देण्याची गरज नसते. हे ग्राहकांनी लक्षात ठेवावे.
वस्तू आॅर्डर करताना आॅनलाईन पैसे देण्यापेक्षा ग्राहकांनी कॅश आॅन डिलिव्हरी हा पर्याय निवडावा. महत्त्वाचे म्हणजे पैसे मिळविण्यासाठी ओटीपी लागत नाही. ग्राहकाच्या खात्यातून पैसे जाणार असतील तरच ओटीपीचा वापर करण्यात येतो.
आॅनलाईन एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्याविषयी पुढील २४ तासांच्या आत संबंधित कंपनीकडे तक्रार करणे गरजेचे आहे.