डिवचू नका ! पोलिसांना खडसावले
By Admin | Published: July 25, 2015 05:07 AM2015-07-25T05:07:23+5:302015-07-25T05:07:23+5:30
निवासी अधिक्षिका (वर्ग २) नियुक्ती तत्काळ करावी, या मागणीसाठी यशस्विनी सोशल वेलफेअर फाऊंडेशनच्या महिलांनी पुणे-नगर रस्त्यावर
शिरूर : निवासी अधिक्षिका (वर्ग २) नियुक्ती तत्काळ करावी, या मागणीसाठी यशस्विनी सोशल वेलफेअर फाऊंडेशनच्या महिलांनी पुणे-नगर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले, या वेळी ‘फोटो सेशन झाले, चला उठा आता’ असे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी महिला आंदोलकांना हिणवल्याने महिला आक्रमक बनल्या, त्यांनी निंबाळकर यांना चांगलेच खडसावले़
साहेब, आम्ही महिलांच्या प्रश्नांसाठी लढतो, फोटोसाठी नाही. आम्ही डोक्यावरचा पदर कमरेलाही खोचू शकतो. आम्हाला डिवचू नका,’ असे दीपाली शेळके व नम्रता गवारी यांनी निंबाळकरांना सुनावले. यामुळे वातावरण चांगलेच तापले. बालगृहातील अनास्थेविरोधात व निकामी अधिक्षिकेच्या नियुक्तीच्या मागणीसाठी यशस्विनी सोशल वेलफेअर फाऊंडेशनच्या महिलांचे गेली चार दिवसांपासून बालगृहासमोर धरणे आंदोलन सुरू आहे.
आज महिलांनी रास्ता रोको आंदोलनाचा निर्णय घेतला. त्यांनी पुणे-नगर महामार्गावर रास्ता रोको केले. महिलांच्या या आंदोलनात विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले.
नगराध्यक्षा मनीषा गावडे, फाऊंडेशनच्या प्रमुख दीपाली शेळके, माजी नगराध्यक्षा सुवर्णा लटांबळे, उज्ज्वला बरमेचा, अलका सरोदे, नगरसेविका सुवर्णा लोळगे, जनता दलाच्या महिला जिल्हाध्यक्षा माया जाधव फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा संगीता मल्लाव, सचिव नम्रता गवारी, आदिशक्ती महिला मंडळाच्या प्रमुख शशिकला काळे, निर्मला अबुज, सुनंदा घावटे, राणी कर्डिले, सुशीला चोरे, क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवराव घावटे, शिक्षण मंडळाचे सदस्य रूपेश गंगावणे, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नीलेश पवार, मनसेचे तालुकाध्यक्ष मेहबूब सय्यद, मनविसेचे अध्यक्ष सुशांत कुटे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख मंगेश खांडरे, रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष अनिल बांडे, संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद भालेराव, उपाध्यक्ष सागर पांढरकामे, शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष बापूसाहेब शिवले, सचिव बाळासाहेब थिटे, संघर्ष प्रतिष्ठानचे शैलेश जाधव, नितीन काळे, जाकिर सय्यद, नितीन जाधव आदींचा आंदोलनात सहभाग होता.
गुन्हे दाखल का नाहीत?
बालगृहातील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संजय पाचंगे यांनी ज्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला त्या अधिकाऱ्यांना
सहआरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तक्रार पोलिसांत दिली होती. आज पाचंगे यांनी निंबाळकर यांना सर्वांसमक्ष वर्ष झाले तरी गुन्हे दाखल का केले नाहीत, असा प्रश्न केला. याची चौकशी करून कारवाई करतो, असे उत्तर निंबाळकर यांनी दिले.
चिडलेल्या महिलांनी, चार दिवस तुम्ही कोठे होता? साधा एक पोलीस शिपाई तेथे पाठवला नाही. आता कशाला आलात, असे म्हणत पोलिस अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महिला ऐकतच नाहीत, म्हटल्यावर निंबाळकर काही वेळ गडबडून गेले. मात्र नंतर पाचंगे, घावटे व घाडगे यांनी सांगितल्यावर महिला पुन्हा धरणे आंदोलनाच्या ठिकाणी परतल्या.
आंदोलनस्थळी आल्यावर तेथे जिल्हा महिला बालविकास अधिकारी एम. आर. बिराजदार यांनी आयुक्तालयाचे पत्र शेळके यांना दिले. मात्र त्या पत्रात काही ठोस नसल्याने शेळके यांनी आंदोलन मागे घेण्याची बिराजदार यांची विनंती फेटाळून लावली. तहसीलदार राजेंद्र पोळदेखील या वेळी उपस्थित झाले. तेथे शेळके यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
त्या म्हणाल्या, ‘‘महिलांच्या समस्यांबाबत महिला बालविकास विभाग संवेदनशील नसेल तर या विभागाविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.’’ स्त्रीच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरावे लागणे ही निंदनीय बाब असल्याचे नगराध्यक्षा गावडे म्हणाल्या. प्रश्न तडीला नेण्याची मागणी बाळासाहेब घाडगे यांनी केली. शिरूर शहर बंद ठेवण्याचा इशारा सय्यद यांनी दिला.