नवीन कर्ज मागायला गेलो तर बँका दारात पण उभे करत नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 12:41 PM2018-11-13T12:41:14+5:302018-11-13T12:54:15+5:30
...तुमच्या सोबत साजऱ्या केलेल्या दिवाळीमुळे कुटुंबाचं दुःखं हलकं झालं..
पुणे : महाराष्ट्रात दुष्काळ उग्र रूप धारण करत आहे.मराठवाड्यात तर तीव्र दुष्काळामुळे यावर्षी पेरणी देखील झाली नाही. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा काही शेतकरी बांधवांना झाला पण असे असले तरी कोणतीच बँक शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी पुढाकार तर सोडाच परंतु, दारात पण उभे करत नाहीत, यातच मग सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते,’अशा हवालदिल शब्दांत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.
नांदेड जिल्ह्यातील १७ आत्महत्याग्रस्त कुटुंबियांंसोबत पुण्यातील ‘भोई प्रतिष्ठान’च्या कार्यकर्त्यांच्या दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमात ‘पुण्यजागर प्रकल्पाच्या’ माध्यमातून भोई प्रतिष्ठान नांदेड जिल्ह्यात अर्धापुर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात पुढे करत आहे. कुटुंबातील मुला-मुलींच्या आरोग्य,शिक्षणाचा खर्च प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जातो.यावर्षी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले, मुली, पत्नी यांच्यासह दहा दिवस आनंदाने पुण्यात दिवाळी साजरी करण्यात आली. निरोपाच्या कार्यक्रमात दिवाळीचा अनुभव सांगताना गणेश म्हणाला, मी जेव्हा माधुरीतार्इंच्या घरी गेलो तेव्हा मला वाटलं की, मी मामाकडेच आलो आहे. आम्ही फटाके फोडले, आळंदीला गेलो, नवीन कपडे घातले, थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याचा आनंद लुटला.याच पार्श्वभूमीवर पुण्यजागर प्रकल्प समनवयक लक्ष्मीकांत मुळे यांनी शासन खूप काही करत आहे, पण शासनाला खूप काही करावं लागलं, अशी टिप्पणी केली. ‘भोई प्रतिष्ठानचे’ मिलिंद भोई म्हणाले, एक दिवस येईल की, तुम्ही तुमची दिवाळी आनंदाने गावी साजरी कराल आणि आम्ही पुणेकर त्या दिवाळीत सामील होऊ. आमदार मेधा कुलकर्णी यांनी शासनाच्या माध्यमातून कामे करत आहोत, असे सांगितले.भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलींद भोई, विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, अभिनेत्री जयमाला इनामदार, सीआयडी पोलीस अधीक्षक शेषेराव सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजीराव पवार, सप महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेटे प्रसंगी उपस्थित होते