डीएसकेंची कोठडीत रवानगी करण्यास एक क्षणही लागणार नाही, हायकोर्टानं खडसावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 11:45 AM2018-01-25T11:45:08+5:302018-01-25T11:45:35+5:30
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी जामीनाची रक्कम भरण्यास पुन्हा अपयशी ठरले आहेत. सध्या डी.एस कुलकर्णींच्या जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे.
मुंबई - पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी जामीनाची रक्कम भरण्यास पुन्हा अपयशी ठरले आहेत. सध्या डी.एस कुलकर्णींच्या जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. डीएसकेंना कोठडीत पाठविण्यात एक क्षणही लागणार नाही. सहारासारखी अवस्था करून घेऊ नका असे हायकोर्टाने डीएसकेनां खडसावलं आहे.
मुंबई हायकोर्टानं डीएस कुलकर्णी यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. आता डीएसके यांना जामीनाची रक्कम भरण्याची मुदतवाढ देण्यात आलं आहे. पाच फेब्रुवारीपर्यंत त्यांना अटकेपासून सुटका मिळाली आहे. पाच फेब्रुवारीपर्यंत जामीनाची रक्कम भरण्याची मुदत कोर्टानं डीएसके यांना दिली आहे.
दरम्यान, बँक व्यवहारात तांत्रिक अडचणी आल्यामुळं जामीनाची रक्कम भरण्यास उशीर झाल्याचा दावा डी.एस. कुलकर्णी यांनी कोर्टात केला. दोन फेब्रुवारी पर्यंत बँक ऑफ बडोदामध्ये पैसे भरण्याची हमी डीएसके यांनी कोर्टात दिली.
गुंतवणुकीवर अधिक परताव्याचे आमिष दाखवत त्यांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी डीएसकेंविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यांनी अनेक सदनिकाधारकांना सदनिकांचा ताबा दिलेला नाही. डीएसकेंनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने देणीदारांची रक्कम कशी देणार, याची माहिती देण्यास तसेच विकता येणा-या मालमत्तांची यादी सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर डीएसकेंनी १९ डिसेंबरपर्यंत ५० कोटी रुपये भरण्याची तयारी दर्शविली. मात्र, ही तारीख उलटून गेल्यानंतरही त्यांनी रक्कम जमा केलेली नाही. आता पुन्हा एकदा डीएसके यांना कोर्टानं मुदतवाढ दिली आहे.