वर्गणीच्या नावाखाली खंडणी घेऊ नका, अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 01:08 AM2018-09-09T01:08:35+5:302018-09-09T01:08:46+5:30
यंदाच्या गणेशोत्सवामध्ये विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न करावा
इंदापूर : यंदाच्या गणेशोत्सवामध्ये विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न करावा, नागरिकांनी स्वच्छेने दिलेली वर्गणी स्वीकारावी व दुकानदार, व्यापारी, पथारीवाले यांना दमदाटी करून वर्गणी मागितल्याची तक्रार आल्यास मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांच्यावर खंडणीची गुन्हे दाखल करण्याचा इशारा बारामती विभागाचे अतिरीक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी दिला आहे.
इंदापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत शहरातील शांतता कमिटीची बैठक व श्री गणराया अवार्ड २०१७ चे पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पखाले बोलत होते. यावेळी तहसिलदार सोनाली मेटकरी, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक मधुकर पवार, पोलीस उपनिरीक्षक अजित जाधव, सुशील लोंढे आदी सामाजिक कार्यकर्ते व मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नारायण शिरगावकर म्हणाले की, कायद्याने वर्गणी मागण्याचा अधिकार केवळ निबंधकांकडे नोंदणी असलेल्या मंडळांना आहे.
गणेशत्सवाची मिरवणूक काढताना गुलाल मुक्त, फटाके मुक्त, डिजेमुक्त मिरवणूक काढण्यात यावेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार साठ डेसिबल पेक्षा जास्त आवाजाचे उल्लंघन केल्यास त्या मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी मंडळांनी आपले स्वयंसेवकांची गणेशमूर्तींना सुरक्षा द्यावी.
शिरगावकर पुढे म्हणाले, अनेक गुन्हेगारांची यादी तयार केली त्यांनी जर नव्याने काही गुन्हा केला तर त्या गुन्हेगारांना लवकरच तडीपारचा आदेश काढण्यात येणार असून, उत्सवा दरम्यान सामाजिक सलोखा राखण्याचे चांगले काम करणाऱ्या मंडळांना श्री गणराय अवार्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी मागील वर्षी २०१७ साली स्पर्धा उत्कृष्ट काम करणा-या मंडळांना श्री गणराय पुरस्कारदेण्यात आला. त्यामध्ये प्रथम क्रमांक श्रीमंत शिवराय प्रतिष्ठाण, द्वितीय क्रमांक संत सावतामाळी मित्र मंडळ, तृतीय क्रमांक विभागून राधिका मित्र मंडळ व नृसिंह गणेशोत्सव मंडळ, उत्तेजनार्थ नेहरू मित्र मंडळ, साईनाथ मित्र मंडळ , छत्रपती शिवाजी मित्र मंडळ यांना सन्मानचिन्ह व वृक्ष देवून गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस अधिकारी विनोद पवार यांनी प्रयत्न केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शिताप, रमेश शिंदे, डॉ. महेश निंबाळकर, अय्याज शेख, महमित्र शिवराज परमार यांनी मनोगत व्यक्त केले व याच वर्षी मोहरम व गणेशोत्सव एकत्रित आल्याने इंदापूर शेख मोहल्ल्यातील नवजवान मित्र मंडळ हे सामाजिक सलोखा जपण्यासाठी मोहरम आणि गणेशोत्सव एकत्रित करणार आहेत.
>मंडळांनी आपले स्वयंसेवक तयार करावेत
प्रत्येक मंडळांनी आपल्या मंडळातील कार्यकर्ते घेवून कायदा आणि सुव्यस्था राखण्यासाठी मंडळातील कार्यकर्ते यांना एक विशेष पोशाख देवून तयार करावे त्याने कायद्याचे उल्लंघन होणार नाही व पोलीस प्रशासनाला देखील मदत होईल
- नारायण शिरगावकर,
उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती