Pune Police: तरुणींची छेड काढू नका, अन्यथा फोटो थेट होर्डिंगवर; गणेशोत्सवात पुणे पोलिसांचा नवा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 06:16 PM2024-09-01T18:16:40+5:302024-09-01T18:18:08+5:30

कुणी छेड काढल्याची तक्रार आल्यास बंदोबस्तावरील पोलीस त्या रोड रोमिओंना पकडून त्यांची छायाचित्रे भर चौकात होर्डिंगवर लावणार

Do not tease young women otherwise photos directly on banner New soluation of Pune Police in Ganeshotsav | Pune Police: तरुणींची छेड काढू नका, अन्यथा फोटो थेट होर्डिंगवर; गणेशोत्सवात पुणे पोलिसांचा नवा फंडा

Pune Police: तरुणींची छेड काढू नका, अन्यथा फोटो थेट होर्डिंगवर; गणेशोत्सवात पुणे पोलिसांचा नवा फंडा

पुणे : गणेशोत्सवातमहिला तसेच तरुणींची छेड काढणाऱ्या रोड रोमिओंना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली असून, कुणी छेड काढली असेल आणि त्याची तक्रार आल्यास बंदोबस्तावरील पोलीस रोड रोमिओंना पकडून त्यांची छायाचित्रे भर चौकात होर्डिंगवर लावणार आहेत. त्यावर त्यांची नावे आणि पत्तादेखील असेल. छेडछाड करणाऱ्यांची पोलिसांकडून धिंडही काढण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

गणेशोत्सवाचा प्रारंभ शनिवारी (दि.७) होणार आहे. वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवात देशातील वेगवेगळ्या भागातून नागरिक येतात. मात्र गणेशोत्सवाच्या गर्दीत महिला व तरुणींची छेड काढण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी आता बंदोबस्तावरील पोलिसांना छेड काढणाऱ्यांवर त्वरित कारवाईचे आदेश पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. महिलांचे दागिने चोरणे तसेच मोबाईल चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी मध्य भागात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

दामिनी पथके गर्दीत गस्त घालणार

महिला पोलिसांची पथके तसेच दामिनी पथके गर्दीत गस्त घालणार आहेत. साध्या वेशातील पोलिसांची पथके मध्य भागात गस्त घालणार आहेत. गर्दीत महिलांची छेड काढताना तसेच अश्लील कृत्य केल्याचे आढळून आल्यास त्यांची छायाचित्रे काढण्यात येणार आहेत. छेड काढणाऱ्यांचे नाव, पत्ता छायाचित्र फलकावर छापण्यात येणार आहे. अशा प्रकारचे पोलिसांकडून फलक चौकाचौकात लावण्यात येणार आहेत तसेच त्यांची परेड देखील घेतली जाणार आहे.

मध्य भागात मदत केंद्रे

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील मध्य भागात अठरा पोलीस मदत केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. उत्सवाची सांगता होईपर्यंत मदत केंद्रांचे कामकाज अहाेरात्र सुरू राहणार आहे. या केंद्रात स्थानिक पोलीस ठाणे, विशेष शाखा, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेतील कर्मचारी तैनात असणार आहेत. तसेच गर्दीत चोरी करणाऱ्या चोरट्यांची यादी तयार करण्यात येणार आहे. मोबाईल चोरी, महिलांकडील दागिने चोरणाऱ्या चोरट्यांची माहिती घेणे तसेच त्यांची यादी करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची जबाबदारी गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आली आहे.

शीघ्र कृती दल तैनात

उत्सवाच्या कालावधीत सहा ठिकाणी शीघ्र कृती दल तैनात करण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीत शीघ्र कृती दल तैनात राहणार आहे. शीघ्र कृती दलातील जवान मनोऱ्यावरून गर्दीवर लक्ष ठेवणार आहेत. गर्दीतील गैरप्रकार, तसेच संशयितांवर नजर ठेवण्यात येणार आहे.

Web Title: Do not tease young women otherwise photos directly on banner New soluation of Pune Police in Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.