महामार्ग हस्तांतरित न करण्याचे साकडे
By admin | Published: June 2, 2017 02:56 AM2017-06-02T02:56:15+5:302017-06-02T02:56:15+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील पाचशे मीटर अंतराच्या आतील दारूची दुकाने बंद करण्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील पाचशे मीटर अंतराच्या आतील दारूची दुकाने बंद करण्यात आली आहेत. या निर्णयाचे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातर्फे स्वागत करण्यात आले आहे. मात्र, महामार्ग महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या ठरावास मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राने विरोध दर्शवला आहे. या विषयीचे निवेदन मुक्तांगण व्यसनमुक्त केंद्रातर्फे संचालक डॉ. अनिल अवचट यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे सुपूर्त केले आहे.
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातर्फे जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास महापौर मुक्ता टिळक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्या वेळी त्यांना हे निवेदन देण्यात आले. महामार्ग महानगरपालिकेकडे हस्तांतरित केल्यास तेथील दारूची दुकाने पुन्हा सुरू होऊन व्यसनाधीनतेचा प्रश्न अधिक गंभीर होईल, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मुक्तांगणच्या उपसंचालक मुक्ता पुणतांबेकर यांनी तंबाखूविरोधी दिनाचे महत्त्व विषद केले.
मुक्ता टिळक म्हणाल्या, व्यसनी व्यक्तीचा स्वत:च्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होत जातो त्यातून आत्महत्यांसारखे प्रश्न निर्माण होतात. अशा परिस्थितीत व्यसनी व्यक्तीला सकारात्मक जीवनाकडे नेण्यासाठी मुक्तांगणतर्फे करण्यात येत असलेले कार्य प्रेरणादायी आहे. व्यसनी व्यक्तींना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही समाजिक गरज आहे.