नारायणगाव, भोर शहरातून प्रवास नको रे बाबा!

By Admin | Published: May 3, 2017 01:41 AM2017-05-03T01:41:11+5:302017-05-03T01:41:11+5:30

सुट्यांचा कालावधी, यात्रा-जत्रांचा हंगाम; तसेच बेशिस्त वाहनचालक यामुळे नारायणगाव शहरातील वाहतूक गेल्या आठवड्यापासून ठप्प

Do not travel to Narayangaon, Bhor city, Baba! | नारायणगाव, भोर शहरातून प्रवास नको रे बाबा!

नारायणगाव, भोर शहरातून प्रवास नको रे बाबा!

googlenewsNext

नारायणगाव : सुट्यांचा कालावधी, यात्रा-जत्रांचा हंगाम; तसेच बेशिस्त वाहनचालक यामुळे नारायणगाव शहरातील वाहतूक गेल्या आठवड्यापासून ठप्प आहे़ नारायणगाव शहरातून जाताना प्रवाशांना नारायणगाव शहरातून नको रे बाबा! असे म्हणण्याची वेळ आली आहे़
नारायणगाव शहरातून २ किमी अंतर कापण्यासाठी प्रत्येक वाहनाला एक ते दीड तासाचा कालावधी लागत आहे़ त्यातच बेशिस्त वाहनचालक तीन ते चार रांगा करून वाहतूक कोंडीत भर घालत आहेत़ त्यामुळे पोलीसदेखील हतबल झाले असून, बायपास रोड कधी सुरू होतो व कधी वाहतूककोंडी सुटेल, याकडे पोलिसांसह संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
नारायणगाव हे शहर पुणे-नाशिक महामार्गावरील प्रमुख शहर म्हणून ओळखले जाते़ या ठिकाणी रोजच होणारी वाहतूककोंडी ही प्रवाशांसह स्थानिक ग्रामस्थांना नकोशी झाली आहे़ बसस्थानकासमोर बेशिस्त लागणाऱ्या दुचाकी, हॉटेलसाठी रस्त्यात थांबणारे वाहनचालक, व्यावसायिकांनी केलेली अतिक्रमणे, बसस्थानकातून बाहेर पडणारे एसटी व चालविणारे बेशिस्त चालक या सर्व बाबींमुळे नारायणगाव येथील वाहतूककोंडी ही नित्याची झाली आहे़ पुणे किंवा नाशिककडे जाणाऱ्या वाहनांची संख्या हजारोने आहे़ या वाहनचालकांना नारायणगाव शहरातून बाहेर पडताना अर्धा ते
पाऊण तासाचा कालावधी लागतो़ वाहतूककोंडी सुरळीत करण्यासाठी नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने दोन पोलीस कर्मचारी व चार ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात आली आहे़ वेळप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक टी़ वाय़ मुजावर स्वत: पोलिसांचा फौजफाटा घेऊन मुख्य चौकात वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात़ दिवसभरातून अनेक वेळा होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे पोलीस कर्मचारी व पोलीस वॉर्डनदेखील हतबल झाले आहेत़
नारायणगाव येथे रस्त्यालगतच व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. या ठिकाणी बसस्थानक असल्याने महामार्गावर गाड्यांची संख्या मोठी असते. मात्र, गाड्या स्थानकात प्रवेश करताना कोंडीमुळे अर्ध्या रस्त्यावर आणि अर्ध्या स्थानकात राहत असल्याने रस्त्यावरील वाहनांना पुढे जाण्यास अडचण निर्माण होते.


वाहतूककोंडी सोडविताना पोलिसांची दमछाक

वाहतूक समस्यांमध्ये वाहतूककोंडी होण्याची अनेक कारणे आहेत़ त्यापैकी मुख्य कारण म्हणजे पुणे-नाशिक महामार्गावर व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण, हॉटेलचालक किंवा अन्य व्यावसायिकांनी आपले फलक किंवा टेबल खुर्च्या रस्त्यालगत थाटल्याने रस्त्यालगतचे अतिक्रमण वाढले आहे़ नारायणगाव शहरातून येणाऱ्या प्रवाशांना वाहतूककोंडीमुळे नारायणगाव शहरातील प्रवास नकोसा झाला आहे़
बेशिस्त वाहनचालकांमुळेदेखील वाहतूककोंडीमध्ये वाढ होत आहे़ अनेक वाहने लाइनमध्ये असलेल्या वाहनांना ओव्हरटेक करून विरुद्घ दिशेने जात असल्याने वाहतूक सेवा विस्कळीत होऊन प्रवाशांना जादा वेळ थांबावे लागते़ सध्या तरी सुट्यांमुळे वाहनांची संख्या वाढलेली आहे़ तरीदेखील नारायणगावातून जाणारा प्रवासी नारायणगाव शहरातून नको रे बाबा, असे म्हणत आहे़


भोर : रस्त्याची अपूर्ण कामे, त्यावरच लावलेली वाहनं, मालवाहतूक करणाऱ्या गाड्या, भाजीपाला फळविक्रेते, दुकानांच्या पाट्या... यातून कसातरी मार्ग काढत बाहेर पडायचे... हे चित्र आहे भोर शहरातील.
धुराचा वास घेत जीव मुठीत धरून शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना वाट काढावी लागत आहे. पोलिसांचा अभाव आणि नगरपालिकेचे दुर्लक्ष यामुळे भोरवासीयांचा श्वास नेहमीच गुदमरतोय. तो वाहतुकीच्या कोंडीतून सुटणार कधी, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. भोर एसटी स्टँॅड ते चौपाटी या मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्यासह पोलीस ठाणे ते राजवाडा चौक व सुभाष चौक ते राजवाडादरम्यानच्या रस्त्यावर ही नेहमीचीच परिस्थिती. मुख्य बाजारपेठ असल्याने दोन्ही बाजूंच्या दुकानदारांकडून शेड बाहेर काढली आहेत. दुकानाच्या विक्रीच्या जाहिरातीचे फलक, भाजी, फळविक्र्रते खेळणी, रिक्षावाले, दुचाकी, चारचाकी व माल पुरवणाऱ्या गाड्या रस्त्यावरच उभ्या असतात. त्यातच वर्षभरापासून रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे व पाइपलाइनचे काम अत्यंत रेंगाळलेल्या अवस्थेत सुरू आहे. नियोजनाच्या अभावामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला टाकलेले पेव्हिंग ब्लॉक काढतात, पुन्हा बसवतात. यामुळे वाहतुकीच्या कोंडीत वाढ होत आहे.

बँका, पतसंस्था आणि व्यापाऱ्यांकडे पार्किंगची सुविधा नाही. एसटी स्टँड परिसरात ११० मीटर नोपार्किंग झोन असूनही पॅसेंजर वाहतूक करणाऱ्या रिक्षा, जीप रस्त्यावरच असतात. शहरातील गोडवूनसमोर उभ्या असलेल्या खतांच्या गाड्या, पंचायत समिती, तहसील, उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर दुचाकी उभ्या असतात.
नीरा नदीवरील नवीन पूल, नवी आळी, सम्राट चौक, भोर पंचायत समिती, राजवाडा चौक आणि सुभाष चौक, पोस्ट, स्टेट बँॅकेसमोर, चौपाटी परिसरात वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. मंगळवारी बाजाराच्या दिवशी तर तासन्तास वाहतूक खोळंबलेली असते. संबंधितांवर कारवाई करण्याची गरज असताना वाहतूक पोलीस मात्र एसटी स्टँडवरील अवैध वाहतूक सुरळीत करण्यातच व्यस्त असतात.

काय करावे लागेल?

ही समस्या सोडविण्यासाठी भोर नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून शहरातील शेडचे टपऱ्यांचे अतिक्रमण हटविणे आणि रस्त्यावरील हातगाडे काढणे, एकेरी वाहतूक सुरू करणे, वाहतूक पोलीस ठेवणे आणि नागरिकांना शिस्त लावली तरच भोर शहरातील वाहतुकीची समस्या कायमची सुटणार आहे. अन्यथा जैसे थे! अशीच अवस्था राहणार आहे.

भोर शहरातील रस्त्यांची कामे सुरू असून त्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीची समस्या भेडसावत आहे. ती सोडविण्यासाठी नगरपालिकेकडून उपाययोजना सुरू आहे. त्यावर तोडगा काढून लवकरच वाहतूक सुरळीत केली जाईल.
- तृप्ती किरवे, नगराध्यक्षा

Web Title: Do not travel to Narayangaon, Bhor city, Baba!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.