पीएमसीवर पुणेकरांना भरोसा नाय का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 03:10 AM2017-08-04T03:10:52+5:302017-08-04T03:10:56+5:30
शहरात साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वेगात होत असूनही महापालिकेचा आरोग्य विभाग त्यावर काहीही प्रतिबंधक उपाययोजना करायला तयार नाही.
पुणे : शहरात साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वेगात होत असूनही महापालिकेचा आरोग्य विभाग त्यावर काहीही प्रतिबंधक उपाययोजना करायला तयार नाही. या विभागाला गेले अनेक महिने प्रमुखच नाही. तरीही सत्ताधारी निवांत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा निषेध करीत महापालिकेच्या आवारात आंदोलन केले.
विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्यासह सर्व नगरसेवक, महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर व सर्व महिला नगरसेवक, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर व पक्षाच्या सर्व आघाड्यांचे प्रमुख, पदाधिकारी कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. महेंद्र पठारे, योगेश ससाणे, भय्यासाहेब जाधव हे नगरसेवक डॉक्टरांच्या वेशभूषेत एका प्रतीकात्मक रुग्णाला घेऊन महापालिकेच्या प्रवेशद्वाराच्या पायºयांवर ठाण मांडून बसले. तिथेच चाकणकर यांनी पुणेकरांचा पीएमसीवर भरोसा नाय हे विडंबनगीत सुरू केले. त्याला उपस्थितांनी प्रतिसाद देत महापालिका दणाणून सोडली. तुपे, चाकणकर, माळवदकर यांची या वेळी भाषणे झाली.