गरीबांच्या ताेंडचा घास हिसकावणाऱ्या गिरीश बापट यांना मतदान करु नका : बाबा आढाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 04:17 PM2019-04-18T16:17:23+5:302019-04-18T16:18:18+5:30
गरीबांच्या तोंडचा घास हिसकवणाऱ्या भाजपाला आणि गिरीश बापट यांना मतदान करु नका असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले.
पुणे : नीरव मोदी, विजय मल्ल्या यांना केलेले सहाय्य, नोटबंदी, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), राफेल घोटाळा यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका सामान्य लोकांच्या गळ्यात धोंडा बांधण्याची असल्याची दिसून येते. तर, भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) उमेदवार गिरीश बापट यांनी सत्तेवर आल्यावर कष्टकऱ्यांच्या विरोधातच भूमिका घेतली. त्यामुळे गरीबांच्या तोंडचा घास हिसकवणाऱ्या भाजपाला आणि गिरीश बापट यांना मतदान करु नका असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. कोणत्याही उमेदवाराच्या आणि पक्षाच्या विरोधी मतदान करण्याचे जाहीर आवाहन करण्याची आढावांची ही पहिलीच वेळ आहे.
रिक्षा पंचायतीचे रावसाहेब कदम, हनुमंत बहिरट, गोरख मेंगडे यावेळी उपस्थित होते. डॉ. आढाव म्हणाले, अन्नधान्य वितरण मंत्री झाल्यानंतर बापट यांनी ‘कष्टाची भाकर’चे रेश्निंग धान्य बंद करण्याचे काम केले. याबाबत त्यांना विनंती केल्यावर त्यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखविले. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतल्यावर राज्य सरकारला तसा आदेश दिला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बापट तोंडघशी पडले. त्यानंतरही धान्य सुरु झालेच नाही. परिणामी कष्टाची भाकर दुप्पटीहून अधिक महागली. महात्माफुले समता परिषदेला टिंबर मार्केट येथील १५ हजार चौरसफूट जागा महानगरपालिकेने मंजुर केली होती. त्यातही बापट यांनी खोडा घातला. शेतकºयांना हमीभाव मिळावा यासाठी केलेल्या आंदोलनावेळी मुख्यमंत्र्यांशी बैठकीचे आश्वासन त्यांनी ऑक्टोबर २०१७ रोजी दिले होते. मात्र, ती बैठक कधी झालीच नाही. कष्टकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या आणि फसव्या बापटांना पुणेकरांनी मतदान करु नये.
केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा कायदा करण्याचे जाहीर केले. त्याला छत्री कायदा असे नाव दिले. मात्र, सामाजिक सुरक्षेची ही छत्री कधी उघडलीच नाही. मोदींच्या काळामध्ये बेरोजगारीमध्ये वाढ झाली. देशांतर्गत आणि सीमेवरील ताणावात वाढला. लोकशाहीचा संकोच, शेतकरी आणि कामगारांची धुळधाण करणारे धोरण राबविण्यात आले. त्यामुळे कामगार आणि शेतमजुरांचे जीवनमान घातक पातळीवर आले आहे. उलट या सरकारच्या काळात धार्मिक ध्रुवीकरणाचे काम झाल्याची टीका डॉ. आढाव यांनी केले.
कष्टकरी विराेधी असलेल्या सरकारला धडा शिकवायला हवा
मोदींच्या गेल्या पाच वर्षांच्या कारभाराचे चटके अंगमेहनती आणि कष्टकऱ्यांना बसले आहेत. चुलीवरची भाकर योग्य वेळी फिरवली नाही, तर करपते. त्यामुळे,कष्टकरी विरोधी असलेल्या सरकारला धडा शिकवायला हवा. मतदारांनी भाजपाला मतदान करु नये.
डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ समाजसेवक