काहीही करून बिबटे जेरबंद करा
By admin | Published: May 8, 2017 02:20 AM2017-05-08T02:20:01+5:302017-05-08T02:20:01+5:30
वढू येथे गेले आठवडाभर बिबट्या आला रेची दहशत असून शनिवारी केलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याने
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव भीमा : वढू येथे गेले आठवडाभर बिबट्या आला रेची दहशत असून शनिवारी केलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याने आता परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत सर्व बिबटे जेरबंद करा, अशी मागणी होत असून वनविभागही खडबडून जागा झाला आहे.
वढू बुद्रुक येथील चाफावाडावस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले रतन शंकर भंडारे या वृद्ध शेतकऱ्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वीही बिबट्याने येथे हल्ले केले असून प्रत्यक्ष पाहिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. असे असताना बिबटे पकडले जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. जखमी भंडारे यांची जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांनी भेट घेऊन परिथितीचा आढावा घेतला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत यापुढे बिबट्याच्या हल्ल्याच्या दुर्दैवी घटना घडल्यास त्यास वनविभागच जबाबदार राहणार असल्याचे सुनावले. कोणत्याही परिस्थितीत बिबट्या जेरबंद झालाच पाहिजे, असा सज्जड दम दिल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनीही बिबट्या पकडण्यासाठी विविध पर्याय राबविणार असल्याचे सांगितले.
या वेळी वनपाल बी. आर. वाव्हळ यांनी सांगितले, ‘वढू परिसरात तीन पिंजरे लावले असून पिंजऱ्यात बिबट्या अडकण्यासाठी शेळी ठेवूनही बिबट्या काही पिंजरा लावलेल्या ठिकाणी आला नसून दोन दिवसांनी पिंजऱ्याचे ठिकाण बदलून बिबट्या पकडण्यासाठी विविध प्रयोग राबवणार असल्याचे वनपाल वाव्हळ यांनी सांगितले.
प्रफुल्ल शिवले : नागरिकांच्या जिवाशी खेळू नका
गेल्या सहा महिन्यांपासून परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. वनविभागाने पिंजरा लावण्यापलीकडे कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही. एका महिन्यात दोन ग्रामस्थांवर बिबट्याने हल्ला केला असल्याने नागरिकांच्या जिवाशी खेळू नका, असे सांगत कोणत्याही परिस्थितीत बिबट्या पकडण्याची मागणी माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी केली.
जखमीला पाहण्यासाठी पोलीस गेलेच नाहीत
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी रतन भंडारे जखमी झाले असून बिबट्या या परिसरात धुमाकूळ घालत असूनही शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे व बीट अंमलदार कांबळे यांनी घटनास्थळी साधी
भेटही न दिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत रमेश गलांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बीट अंमलदार घटनास्थळी गेले असल्याचे सांगितले.