महाविद्यालय मान्यतेसाठी अधिकारी घेतात पैसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:23 AM2021-01-13T04:23:41+5:302021-01-13T04:23:41+5:30
पुणे: सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून महाविद्यालय मान्यतेच्या प्रक्रियेसाठी संस्थाचालकांकडून पैसे घेतले जात असल्याचा खळबळजनक आरोप अधिसभा सदस्य अमित ...
पुणे: सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून महाविद्यालय मान्यतेच्या प्रक्रियेसाठी संस्थाचालकांकडून पैसे घेतले जात असल्याचा खळबळजनक आरोप अधिसभा सदस्य अमित पाटील यांनी रविवारी अधिसभेच्या बैठकीत केला. तसेच विद्यापीठाने याबाबत चौकशी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय सुरू करण्यासाठी विद्यापीठातर्फे ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातात. तसेच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही कागदपत्र ऑफलाइन पद्धतीने जमा करावी लागतात. मात्र, विद्यापीठातील काही अधिकारी महाविद्यालय मान्यतेच्या प्रक्रियेसाठी ५० हजार रुपये घेत असल्याचा आरोप अमित पाटील यांनी केला. त्यामुळे अधिसभेत एकच गोंधळ उडाला. तसेच या संदर्भात लेखी तक्रार प्राप्त झाल्यास विद्यापीठाकडून चौकशी केली जाईल, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी स्पष्ट केले.
अमित पाटील म्हणाले, एका संस्थाचालकाकडून विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्याने महाविद्यालय मान्यतेच्या प्रक्रियेसाठी ५० हजार रुपयांची मागणी करून पैसे घेतले. मात्र, हा उघडपणे भ्रष्टाचार असून त्याची विद्यापीठाने चौकशी करावी,अन्यथा विद्यापीठाविरोधात आंदोलन केले जाईल.
डॉ. करमळकर म्हणाले, विद्यापीठाकडून महाविद्यालय मान्यतेची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाते. मात्र,मान्यतेच्या प्रक्रियेसाठी कोणी पैसे घेतले असतील तर संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित केले जाईल.