'लोकसभेसाठी आमचे काम करा, राज्याचे पद देतो', वसंत मोरेंना भाजपकडूनही ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 09:58 AM2024-03-19T09:58:58+5:302024-03-19T10:00:14+5:30
वसंत मोरे यांना कोणत्याच पक्षाकडून ‘शब्द’ मिळाला नाही तरी ते अपक्ष म्हणून लोकसभा लढवण्याची शक्यता
पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांना भारतीय जनता पक्षाकडूनही ऑफर आली होती. ‘तुम्ही आमच्याकडे या, लोकसभेसाठी आमचे काम करा, राज्याचे पद देतो, शिवाय विधानसभेचेही पाहू’ अशा शब्दांमध्ये भाजपच्या एका राज्यस्तरावरील नेत्याने ऑफर दिली असल्याची माहिती खुद्द मोरे यांनीच ‘लोकमत’ला दिली. मात्र, आपल्याला लोकसभानिवडणूक लढवायचीच आहे, त्यामुळे त्यांना स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला असे ते म्हणाले.
मनसेचा राजीनामा दिला तो लोकसभानिवडणूक लढवायची म्हणूनच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्षांकडे चुकीचा, नकारात्मक अहवाल दिला, तो मान्य नाही त्यामुळेच पक्ष सोडला व आता लोकसभा लढू नका, विधानसभेचे पाहू हा प्रस्ताव मान्य करणे शक्यच नाही असे मोरे यांनी सांगितले. पुण्यात त्यांच्या नावाची चर्चा सुरू असताना मोरे मात्र मंगळवारी दिवसभर मुंबईत होते. तुम्ही इथे बारह उडवून दिलात व तिथे मुंबईत काय करता आहात, असे विचारल्यावर त्यांनी चर्चा सुरू आहेत, असे सांगितले.
चर्चा कोणाबरोबर त्याचा थांगपत्ता मात्र त्यांनी लागू दिला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटण्यासाठी गेलो होतो. पक्षप्रवेश किंवा अन्य कोणतेही राजकीय कारण नव्हते व नाही. काँग्रेसने ऑफर दिली, मात्र ती स्थानिक स्तरावर आहे, वरिष्ठ स्तरावर त्यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याचे मला समजले आहे, मात्र, अद्याप मला कोणीही संपर्क केलेला नाही, असे मोरे म्हणाले. लोकसभा निवडणूक लढवणार या मुख्य मुद्द्यानंतर माझे सर्वांशी बोलणे सुरू होते, ते कोणाला पटले तर पुढे चर्चा होते अन्यथा थांबते, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मोरे यांना कोणत्याच पक्षाकडून ‘शब्द’ मिळाला नाही तरी ते अपक्ष म्हणून लोकसभा लढवतील असे आज तरी दिसते आहे तसे झाले तर पुण्यातील लोकसभा निवडणूक तिरंगी होण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसने धंगेकर यांना उमेदवारी दिली तर लोकसभेच्या रिंगणात महापालिकेचे ३ नगरसेवक, तेही परस्परांच्या विरोधात असे चित्र पुण्यात पाहायला मिळणार आहे.