कोरोनापासून असा करा लहान मुलांचा बचाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:09 AM2021-04-18T04:09:50+5:302021-04-18T04:09:50+5:30

महाराष्ट्रात मार्च २०२१च्या शेवटीपर्यंत वय वर्षे १२ खालील ६०,००० मुले कोरोनाने बाधित झाली. त्याचबरोबर मुलांमध्ये दिसणारी लक्षणे ही तीव्र ...

Do this to protect children from corona | कोरोनापासून असा करा लहान मुलांचा बचाव

कोरोनापासून असा करा लहान मुलांचा बचाव

Next

महाराष्ट्रात मार्च २०२१च्या शेवटीपर्यंत वय वर्षे १२ खालील ६०,००० मुले कोरोनाने बाधित झाली. त्याचबरोबर मुलांमध्ये दिसणारी लक्षणे ही तीव्र स्वरूपाची आढळून आली. विविध राज्यांत कोरोनाबाधित असणाऱ्या लहान मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे साहजिकच पालकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

* दुसऱ्या कोरोना लहरीत लहान मुलांना कोरोना संसर्ग जास्त होत आहे का?

- याचे मूळ कारण राज्यात एकूणच संसर्गाचे प्रमाण वाढले आहे व तसेच हा विषाणू जास्त प्रमाणात संसर्गजन्य झाला आहे. त्यामुळे मागील वर्षी १ रुग्ण ३-४ लोकांना बाधित करीत होता आता हे प्रमाण २०-२५ आहे. या जास्त संसर्गजन्य विषाणूमुळे सर्वच कुटुंब बाधित होत आहे. तसेच, लहान मुलांना कोरोना संसर्ग न होण्यासाठी असणारे सर्व नियम पाळणे कठीण असते. या कारणांनी व नवीन विषाणूतील बदलामुळे लहान मुले जास्त प्रमाणात सध्या बाधित होत आहेत.

* लहान मुलांना सध्या होणारा कोरोना जास्त गंभीर आहे का?

-पालकांनो, मुलांना काेरोना मागील वर्षी नक्कीच साैम्य तसेच लक्षणे नसलेला होता त्यामानाने सध्या लक्षणे जास्त दिसून येण्याचे प्रमाण वाढले आहे हे खरे. परंतु त्यासाठी घाबरण्यासारखे काहीही नसून जर वेळेत व लवकर वैद्यकीय सल्ला घेतल्यास मुलांची प्रकृती गंभीर होत नाही. खूप कमी प्रमाणात विशेषत: ज्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती काही कारणांनी कमी आहे, जसे किडनीचा आजार, हृदयरोग, प्रदीर्घ काळ स्टेरॉइडच्या गोळ्या असणे या मुलांना गंभीर स्वरूपातील आजार होण्याचे प्रमाण खूप कमी आहे.

* लहान मुलांमधील कोरोनाची लक्षणे कशी ओळखाल?

- लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्यास वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. मुख्यत: १०० अंश व जास्त प्रमाणात ताप येणे, सर्दी, खोकला, अंगदुखी ही लक्षणे मोठ्यांसारखीच असतात पण काही मुलांमध्ये जुलाब, उलट्या, झटके येणे व धाप वाढणे ही लक्षणे ही आढळतात. त्यामुळे वरील लक्षणे असल्यास लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

* लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्यापासून काय काळजी घ्याल?

- लहान मुलांना कोरोना नियम पाळणे खूप कठीण असते, जसे सतत मास्कचा वापर मुले करीत नाहीत त्यामुळे मोठ्यांनीच मास्क वापरावा. लहान मुलांना शक्यतो गर्दीत नेणे (माॅल, बाजार, दुकाने हाॅटेल इ.) टाळावे.

लहान मुले मोठ्यांचे अनुकरण लगेच करतात त्यामुळे कोरोनाचे नियम सतत हात धुणे, शारीरिक अंतर , मास्क या गोष्टींचे महत्व मुलांना सांगून त्यांना त्याचे पालकत्व करण्यास प्रोत्साहीत करावे. बाहेरून जर घरात आल्यास लहान मुलांना जवळ घेऊ नये. बाहेरून आल्यावर स्वच्छ हात धुवून, कपडे बदलून व अंघोळ करूनच मुलांना जवळ घ्यावे.

मोठ्या माणसांनी वापरलेला मास्क लहान मुले हातात घेणार नाही यासाठी प्रामुख्याने लक्ष द्यावे.

घरात जर कुटुंबातील व्यक्तीस कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वत:ला आयसोलेट करून लहान मुलांपासून दूर राहावे व घरातही मास्कचा वापर करावा व लवकर वैद्यकीय सल्ला घ्यावा.

घरात आपण प्रामुख्याने जेवताना मास्क काढून जवळ बसतो. शक्य असल्यास जेवतानाही लांब बसून अंतर ठेवून जेवण करावे.

मुलांचा आहार व मानसिक आरोग्याची काळजी काय घ्यावी?

मुलांना घरातील सकस व ताजे अन्न द्यावे, फळाचे व हिरव्या भाज्यांचे प्रमाण जेवणात असावे. तळलेले व बाहेरील फास्टफूड टाळणे गरजेचे आहे.

सतत घरात असल्याने मुलांना टीव्ही, मोबाइल इत्यादी गोष्टींची सवय लागत आहे व त्यामुळे स्क्रीनटाइम वाढतोय कमी हालचाल व सतत बसून राहिल्याने स्थूलताची प्रमाण मुलांमध्ये खूप वाढले आहे.

घरातील व्यायाम शक्य झाल्यास योगा मुलांना करण्यास प्रोत्साहीत करावे.

मुलांच्या मानसिक आरोग्यावरदेखील कोरोनामुळे परिणाम दिसत आहेत. घरात सतत बंद असल्याने चिडचिडेपणा, घरातील इतर जागादेखील मुलांचे मानसिक आरोग्य बिघडवीत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांशी सतत सकारात्मक संवाद साधावा व त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तर घेऊन शंकेचे निरासन करावे.

बाळाला कोरोनाची लागण झाल्यास?

- बाळाला जर कोरोनाची लागण झाल्यास घाबरून जाऊ नये. मुलांना योग्य उपचार चालू करून जर लक्षणे जास्त असल्यास तसा डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात भरती करावे. त्याच्या सोबत राहणे गरजेचे असल्याने पालकांनी एन-९५ मास्कचा वापर करावा व सतत हात धुणे या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात.

बाळाला घरात विलगीकरण करताना घरातील इतर व्यक्तींपासून प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांपासून विलगीकरण करावे. मुलांना कोरोनाची लक्षण जरी नसतील किंवा साैम्य असतील तरीदेखील त्याच्यामार्फत इतर व्यक्तींना संसर्ग होऊ शकतो व ते बनू शकतात. त्यामुळे मुलांना विलगीकरण करताना सर्व नियम कटाक्षाणे पाळणे गरजेचे आहे.

तसेच मुलांवर डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय घरगुती उपचार जसे वाफ घेणे इत्यादी टाळावे. बरेच वेळा वाफ घेताना मुलांना भाजल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

* कोविड लस मुलांना देता येइल का?

- आजतागायत लहान मुलांना कोरोनाची लस देत नाही. परंतु लवकरच पुढील काही महिन्यांत जगात चाललेल्या मुलांवरील कोविड लसचे निरीक्षणे समोर येणार आहेत त्यानंतर मुलांनाही कोविड लस लवकरात लवकर मिळेल. मुलांचे इतर आजारावरीलसहीत लसीकरणबाबत घ्यावयाची काळजी.

- मुलांना सर्व लसी त्याच्या वयाप्रमाणे देण्यात याव्यात. त्यामध्ये दिरंगाइ करू नये. कोरोना महामारी जरी असली तरी सर्व सरकारी रुग्णालये व खासगी रुग्णालयात मुलांच्या लसी नेहमीप्रमाणे उपलब्ध आहेत.

कोरोना संक्रमित माता व नवजात शिशू घ्यावयाची काळजी.

- कोरोनाबाधित गर्भवतीची प्रसूती झाल्यास प्रामुख्याने मातेकडून गर्भातून नवजात शिशूला कोरोना होण्याचे प्रमाण नगण्य आहे. तरी काही नवजात शिशूला ही लागण झालेली आढळते. नवजात शिशूंना मातेजवळ ठेवून त्यांना स्तनपान नेहमीप्रमाणे करणे गरजेचे आहे. मातेच्या दूधातून शिशूस कोरोनासंसर्ग होत नाही. माताने स्तनपान करताना स्वच्छ हात धुवून घ्यावेत व मास्कचा वापर कटाक्षाने करावा. जेणेकरून कोरोनाचा संसर्ग शिशूस होणार नाही.

- डॉ. उदय राजपूत/ डॉ. आरती किणीकर

Web Title: Do this to protect children from corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.