धर्मनिरपेक्षतावाद्यांना भावना नाहीत का? जावेद अख्तर यांचा सवाल : शबाना आणि अख्तर यांच्याशी गप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 02:50 AM2017-09-09T02:50:02+5:302017-09-09T02:50:32+5:30
शबाना आणि मी एकमेकांना कधी भेटलो ते आता आठवतही नाही. दोन्ही कुटुंबांचा अनेक वर्षांचा ॠणानुबंध आहे. एकमेकांवरील अतूट प्रेम आणि विश्वासाच्या मैत्रीपूर्ण नात्यावर वैवाहिक जीवनाचा प्रवास सुखकर आणि रुचकर झाला.
पुणे : शबाना आणि मी एकमेकांना कधी भेटलो ते आता आठवतही नाही. दोन्ही कुटुंबांचा अनेक वर्षांचा ॠणानुबंध आहे. एकमेकांवरील अतूट प्रेम आणि विश्वासाच्या मैत्रीपूर्ण नात्यावर वैवाहिक जीवनाचा प्रवास सुखकर आणि रुचकर झाला. आमच्यातही अनेकदा मतभेद होतात; मात्र आम्ही एकमेकांच्या मतांचा आदर करतो, प्रोत्साहन आणि भक्कम पाठिंबा देतो, असा गीतकार आणि लेखक जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी आपल्या सुखी संसाराचा मंत्र सांगितला. ‘एक बीवी, दो टीव्ही’ हे आमच्या सुखी संसाराचे गुपित असल्याचे त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. ‘आजकाल लहानसहान गोष्टींवरून अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. मात्र, धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीयत्व जपणाºयांच्या भावनांचे काय?’ असा सवालही अख्तर यांनी उपस्थित केला.
पाचव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये शबाना आझमी
आणि जावेद अख्तर यांचे ‘माय
स्टोरी, अवर स्टोरी’ हे चर्चासत्र रंगले. त्यांची ‘स्टोरी’ जाणून घेण्यासाठी सभागृहात एकच गर्दी झाली होती. या वेळी या द्वयीने लहानपणापासूनचे संस्कार, कलाक्षेत्रातील प्रवास, समाजातील बदलती स्थिती, विचारसरणी याबाबत खुलेपणाने मते नोंदवली.
अख्तर म्हणाले, ‘‘लहानपणी जे शिकवले जाते, त्याचा मनावर खोलवर परिणाम होत असतो. मला लहानपणापासून कधीच धर्म शिकवला गेला नाही. धर्मनिरपेक्षता, स्त्री-पुरुष समानता, राष्ट्रीयता हीच मूल्ये संस्कारांतून रुजली. या मूल्यांना धक्का लागला तर त्रास होतो. मुलांवर लहानपणापासून राष्ट्रीयत्व, सामाजिक बांधिलकी, कला आदी संस्कार झाले पाहिजेत. त्यातूनच माणूस घडतो.’’
शबाना आझमी म्हणाल्या, ‘‘गेल्या काही वर्षांमध्ये समाजात कमालीचा बदल झाला आहे. धर्म, जात हे विषय संवेदनशील झाले आहेत. त्यातून निर्माण होणारी विदारक परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. अशा वेळी कला हे सामाजिक बदल घडवणारे शस्त्र असते. स्त्री-पुरुष समानता आल्याशिवाय समाजाची प्रगती होऊच शकत नाही. स्त्री आणि पुरुष एकमेकांपेक्षा पूर्ण वेगळे आहेत, त्यांची स्वत:ची ओळख आहे. ही ओळख जपून समतोल साधला जायला हवा. पुरुष स्त्रीवादी असू शकत नाही किंवा स्त्री कणखर असू शकत नाही, हा समज मोडून काढायला हवा.’’
‘स्टार’ होत असताना कलाकाराच्या आयुष्याला वेगळे वळण मिळत असते. खºया जगाशी, तेथील माणसांशी कलाकाराचा
संपर्क तुटत जातो. संवादाची
दालने बंद होतात. अशा परिस्थितीत पुन्हा कलाच ही दालने खुली
करते. विशिष्ट भूमिकेतील
कलाकार आणि प्रत्यक्ष आयुष्यातील कलाकार यांत खूप फरक
असतो, हे प्रेक्षकांनी समजून
घ्यायला हवे. मी आजवर मला आवडलेल्या आणि पटलेल्या भूमिकाच साकारत आले आहे’, असेही त्या म्हणाल्या.