तुम्हालाही राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा व्हीआयपी पास हवाय का? सोशल मीडियावर फिरताहेत मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 12:45 PM2024-01-16T12:45:20+5:302024-01-16T12:50:02+5:30

अशा मेसेजवर विश्वास ठेऊ नये आणि सायबर फसवणुकीला बळी पडल्यास तत्काळ सायबर पोलिसांना कळवावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर सेलकडून करण्यात आले आहे....

Do you also want a VIP pass for Ram Mandir Inauguration Ceremony? Messages are circulating on social media | तुम्हालाही राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा व्हीआयपी पास हवाय का? सोशल मीडियावर फिरताहेत मेसेज

तुम्हालाही राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा व्हीआयपी पास हवाय का? सोशल मीडियावर फिरताहेत मेसेज

पुणे : राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्याचाच फायदा घेत सायबर चोरट्यांनी भाविकांना लुटण्याची नवी शक्कल लढवली असल्याचे काही घटनांवरून समोर आले आहे. ‘तुम्हाला राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा व्हीआयपी पास हवा आहे का?’ अशा आशयाचा मेसेज पाठवून लूट केल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा मेसेजवर विश्वास ठेऊ नये आणि सायबर फसवणुकीला बळी पडल्यास तत्काळ सायबर पोलिसांना कळवावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर सेलकडून करण्यात आले आहे.

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त देशभरात राममय वातावरण झाले असताना अनेकजण रामभक्तांची फसवणूक करत आहेत. सोशल मीडियावर क्यूआर कोड पाठवून राममंदिरासाठी देणगी देण्याचे आवाहनही केले जात आहे. त्याचबरोबर व्हीआयपी पासच्या नावाखाली क्यूआर कोडच्या माध्यमातून पैसे उकळले जात आहेत. अशा घटनांपासून सावध राहावे. रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी कोणत्याही संस्थेला अशाप्रकारे निधी गोळा कारण्यासाठी किंवा व्हीआयपी पास देण्यासाठी परवानगी दिलेली नसल्याची माहिती रामजन्मभूमी मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिली आहे.

अशा पद्धतीने होतेय भक्तांची लूट...

सायबर चोरटे व्हॉट्सॲपवर किंवा मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठवून २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी व्हीआयपी पास मोफत मिळण्याचा दावा करतात. त्यानंतर पुढे मेसेजमध्ये रामजन्मभूमी ट्रस्टच्या वतीने तुम्हाला व्हीआयपी एंट्री पास देण्यात येईल असे सांगितले जाते. पास मिळवण्यासाठी एका लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. लिंकवर क्लिक करताच अनोळखी ॲप्लिकेशन डाउनलोड होते. काही मेसेजमध्ये व्हीआयपी प्रवेश एक्सेस मिळवण्यासाठी राम जन्मभूमी गृहसंपर्क अभियान नावाची फाईल इन्स्टॉल करण्यास सांगितले जाते. खासगी डाटा चोरून खाते रिकामे केले जाते.

२२ जानेवारीच्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी केवळ असे लोक उपस्थित राहू शकतात ज्यांना राम मंदिर जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून किंवा सरकारकडून रितसर निमंत्रण मिळाले आहे. फसवे मेसेज पाठवून भक्तांच्या भावनांशी खेळ खेळ केला जात आहे. भक्तांनी लोकांनी अशा लिंक किंवा फाईल्स मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नयेत.

- दिव्यांशु पांडे, राममंदिर तीर्थक्षेत्र जन्मभूमी ट्रस्ट

अशाप्रकारच्या लिंकमधून एखादे गेमिंग ॲप गुप्तपणे तुमचा आर्थिक डेटा किंवा फोटो एडिटर तुमच्या डिव्हाइसवर स्पायवेअर एम्बेड करू शकते. लॉगिन क्रेडेन्शियल्स, बँकिंग तपशील तसेच कॉन्टॅक्ट लिस्टसह तुमची वैयक्तिक माहिती चोरी केली जाऊ शकते. अशाप्रकारचे ॲप्स तुमच्या डिव्हाइसच्या माध्यमातून तुमच्यावर पाळत ठेऊ शकते. कॉल रेकॉर्ड करू शकतात आणि कीस्ट्रोक कॅप्चर करू शकतात. यामुळे तुमच्या फोनमधील डेटा चोरीला जाऊ शकतो किंवा फोनमध्ये धोकादायक मालवेअर ॲप्स येऊ शकतात. अशा प्रकारच्या लिंकच्या माध्यमातून तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते.

- संजय शिंत्रे, पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र सायबर सेल

Web Title: Do you also want a VIP pass for Ram Mandir Inauguration Ceremony? Messages are circulating on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.