तुम्ही पेट्रोल भरल्यावर बिल चेक करता का? पंप चालकांकडून नकळत पैशाची खुलेआम लूट...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 02:18 PM2022-11-06T14:18:36+5:302022-11-06T14:24:33+5:30
इंधन भरून झाल्यावर पावती पाहणे अत्यंत महत्त्वाचे
विक्रम मोरे
पुणे/लष्कर : पेट्रोल पंपावर तुम्ही पेट्रोल भरताना बिल घेताना पावती न पाहिल्याने आपल्या नकळत काही पैशाची फसवणूक होत असल्याचे अनेक निरीक्षणांवरून आढळून आले आहे. त्यामुळे इंधन भरून झाल्यावर पावती पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
शहरात कुठेही पेट्रोल भरताना सध्याच्या डिजिटल युगात आसंख्य नागरिक हे विविध बँकांच्या पेमेंट कार्डद्वारे पेट्रोलचे बिल पेड करतात. परंतु लिटरमध्ये पेट्रोल भरताना पंपावरील कामगारांकडून गिऱ्हाईकाच्या नकळत राऊंड फिगर पैशाची कार्ड मारले जाते आणि गिऱ्हाईकही घाईगडबडीत असल्याने पावती मागत नाही किंवा घेतली तर तसेच खिशात ठेवतात. त्यामुळे नकळत पंप चालकांकडून नकळत पैशाची लूट खुलेआम सुरू आहे. दिवसभर हा आकडा काही हजारांवर जातो. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला नकळत कात्री मारली जाते. यातून हे पंप चालक हजारो रुपये कमावतात.
आजचा पेट्रोल भाव पुण्यात १०५.८२ रुपये आहे. आज पुण्यातील एका नामांकित पेट्रोल पंपावर जेथे हिंदुस्तान पेट्रोलियमचे विभागीय कार्यालय आहे. तेथे एका गिऱ्हाईकाने ३ लिटर पेट्रोल कार्डद्वारे टाकण्यास सांगितले असता, कामगाराने तीन लिटर पेट्रोल टाकले. परंतु कार्ड मारताना ३१८ रुपये असे बिल तयार केले. खरेतर १०५.८२ रुपये प्रति लिटर याप्रमाणे ३१७.४६ रुपये इतके बिल देऊन तेवढेच पैसे घेणे अपेक्षित असताना ५४ पैसे अधिकचे घेतले गेले. अशा प्रकारे दररोज लाखो नागरिकांची अशाच प्रकारे हजारो रुपये हे पेट्रोल पंप चालकाच्या घशात रोजच जात आहेत. दररोजच्या घाईगडबड आणि धकाधकीच्या जीवन जगताना सामान्य नागरिक त्यातल्या त्यात मराठी माणूस अशा छोट्या पैशाकडे लक्ष देत नाहीच आणि त्यांची फसवणूक होते.
अशा प्रकारे पुणेकरांची दररोज मिनटामिनिटाला फसवणूक होत असते. जर कोणी जाब विचारलंच तर चुकून झाले, आमच्याकडे राऊंड फिगर पेट्रोल टाकले जाते. सिस्टममध्ये अशीच जोड आहे. काय झालं? हे घ्या पैशाच्या बद्दल रुपया, आम्हालाही कमी द्या. यावर अशी विचित्र उत्तरे दिली जातात आणि आपण चाळीस पैशासाठी का कटकट म्हणून निघून जातो.
पंपावर व्यवस्थापकच नाहीत -
शनिवारी झालेल्या प्रकाराबाबत कर्मचाऱ्याची व्यवस्थापक, तक्रार वाही कुठे आहे विचारले असता, व्यवस्थापक नाहीत, असे उत्तर मिळाले. परंतु या कर्मचाऱ्यांची विचारपूस करताना कुठून तरी लगेचच व्यवस्थापक आला आणि त्या कर्मचाऱ्याला ओरडला.
कर्मचाऱ्यांचे नियमित प्रशिक्षण गरजेचे -
पेट्रोलियम मंत्रालयाच्या नियमानुसार पंपावरील सर्व कर्मचाऱ्यांचे सहा महिन्यांतून एकदा रीतसर प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, फायर फायटिंग ट्रेनिंग, कॉन्सेलिंग करणे गरजेचे आहे. परंतु याबाबत कुठलीच प्रक्रिया पंपावर नियमित पार पडली जात नाही. याबाबत हिंदुस्तान पेट्रोलियमच्या विक्री अधिकारी संजू नायर यांनी घडलेल्या घटनेबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करू, असे सांगितले .