तुम्ही वाहतूकीचे नियम पाळणारे आहात ? तर पुणे वाहतूक पाेलिसांची ''ही'' ऑफर आहे तुमच्यासाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 12:11 PM2019-05-21T12:11:18+5:302019-05-21T12:14:49+5:30
वाहतूकीचे सर्व नियम पाळणाऱ्या तसेच वाहतूक नियम भंगाचा कुठलाही खटल दाखल नसलेल्या वाहन चालकाला वाहतूक पाेलिसांकडून गिफ्ट व्हाऊचर देण्यात येणार आहे.
पुणे : पुण्यात वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस जटील हाेत चालली आहे. पुण्याच्या लाेकसंख्येपेक्षा अधिक वाहने शहरात आहेत. त्यातच दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक असल्याने नियम माेडणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. त्यामुळे वाहतूक नियमांबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी, तसेच त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे यासाठी आता पुणे वाहतूक पाेलिसांनी नामी शक्कल लढवली आहे. वाहतूक नियम भंगाची कुठलिही कारवाई न झालेल्या तसेच वाहतूकीचे सर्व नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना पाेलिसांकडून गिफ्ट व्हाऊचर देण्यात येणार आहे. येत्या आठवड्याभरात ही याेजना सुरु करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पाेलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली.
पुण्यात वाहतूकीचे नियम माेडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. काही दिवसांपूर्वीच एका कार चालकाला वाहतूक पाेलिसांनी 27 हजार रुपयांचा दंड केला हाेता. ई चलनच्या माध्यमातून वाहतूक नियम माेडणाऱ्यांवर माेठ्याप्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच सीसीटिव्हीच्या माध्यमातून देखील नियम माेडणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ठिकठिकाणी बंदाेबस्तासाठी असणारे वाहतूक पाेलीस वाहनचालकांच्या गाडीची तपासणी करतात. वाहनावर कुठला दंड आहे का हे पाहतात. ताे असल्याच तात्काळ वसूल केला जाताे. गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक पाेलिसांकडून जाेरदार कारवाई करण्यात येत आहे. त्यातच आता नागरिकांनी नियम पाळावेत यासाठी गिफ्ट व्हाऊचर देण्याची याेजना आणण्यात आली आहे.
ज्या वाहनावर कुठलाही वाहतूक नियमभंगाचा खटला नसेल, वाहनचालकाने कुठलेही वाहतूकीचे नियम माेडले नसतील तर त्याला गिफ्ट व्हाऊचर पाेलिसांकडून देण्यात येणार आहे. वाहनावर कुठलाही खटला नसेल तसेच वाहनचालकाकडे गाडीची सर्व कागदपत्रे असतील तर अशा वाहनचालकांना एक नंबर त्यांच्या माेबाईलवर पाठविण्यात येईल. हा क्रमांक डिस्काऊंट कुपन सारखा असेल. वाहनचालकाने काही ठराविक दुकान, माॅलमधून काही खरेदी केल्यास त्याला दहा टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. वाहतूकीचे नियम पाळण्यासाठी प्राेत्साहन देण्यासाठी ही याेजना राबविण्यात येत आहे.