फेसबुकवरच्या सुंदर चेहऱ्यांच्या ‘रिक्वेस्ट’ना तुम्ही भुलताय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:08 AM2021-07-04T04:08:13+5:302021-07-04T04:08:13+5:30
बनावट खात्यांचा सुळसुळाट : चोवीस तासांत होते कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करून ...
बनावट खात्यांचा सुळसुळाट : चोवीस तासांत होते कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करून नागरिकांची फसवणूक करणे, एखाद्याची बदनामी करणे, असे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. सोशल मीडियावर फेक अकाऊंटसंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर २४ तासांत ते अकाऊंट बंद केले जाईल, असे केंद्र सरकारचा आयटी नियम सांगते. पुणे शहर पोलीस दलातील सायबर पोलीस ठाण्यात दाखल होणा-या अशा बनावट अकाऊंटच्या तक्रारीनंतर ते अकाऊंट सरासरी २४ तासांत बंद केले जाते.
सायबर पोलीस ठाण्यात आलेल्या बनावट अकाऊंटच्या तक्रारी
२०२० - ७९१
२०२१ (जूनअखेर) - ८१७
कोरोना काळात वाढल्या तक्रारी
सोशल मीडियावर बनावट अकाऊंट उघडून त्याद्वारे फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या संपूर्ण वर्षभरात २०२० मध्ये सायबर पोलीस ठाण्यात ७९१ तक्रारी आल्या होत्या. या सर्व तक्रारींचे निराकरण करून ती बनावट अकाऊंट पोलिसांनी बंद केली आहेत. यंदा पहिल्या सहा महिन्यांतच त्याच्यापेक्षा अधिक ८१७ तक्रारी आल्या आहेत. त्यातील बहुतांश अकाऊंट बंद करण्यात आली आहेत.
सोशल मीडिया वेबसाईटकडून मिळत नाही प्रतिसाद
बनावट अकाऊंटबाबत तक्रार आल्यावर त्या त्या सोशल मीडिया वेबसाईटला पोलीस तातडीने ई-मेल करून माहिती देऊन अकाऊंट बंद करण्यास सांगतात. फेसबुक, ट्विटर किंवा अशा वेबसाईटला कारवाई करणे बंधनकारक असूनही ते लवकर प्रतिसाद देत नाही. त्याबाबत पोलीस पाठपुरावा करतात. त्यावर उपाय म्हणून पोलीस अधिकारी मॅन्युअली रिपोर्ट करून ते बनावट अकाऊंट स्वत: बंद करण्याची कारवाई करतात.
बनावट अकाऊंटद्वारे होते फसवणूक
सायबर चोरटे हे एखाद्याचे बनावट अकाऊंट तयार करून त्याद्वारे त्यांचे मित्र, नातेवाईक, परिचित यांना वेगवेगळी भावनिक कारणे सांगतात. त्यांना पैसे पाठविण्यास सांगून फसवणूक करतात. तसेच अनेकदा प्रेमसंबंधातून जवळचे मित्रमैत्रिणी एखाद्याचा गैरफायदा घेऊन त्याचे बनावट अकाऊंट तयार करतात. त्या बनावट अकाऊंटद्वारे त्याची बदनामी करण्याचे प्रकार घडत असल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे.
तुम्हाला बनावट अकाऊंट दिसले तर...
बनावट अकाऊंट दिसले तर नेहमीप्रमाणे आपण सायबर पोलीस ठाण्याकडे तक्रार करायची. सायबर पोलिसांना ई-मेलद्वारेही नागरिक तक्रार करू शकतात. तक्रार मिळाल्यानंतर पोलीस संबंधितांना कळवितात. तसेच पोलीसही स्वत: ते अकाऊंट बंद करायची कारवाई करतात.
.......
आपले सोशल मीडियावरील अकाऊंट कोणाला पाहू द्यायचे हे स्वत: अकाऊंटधारकाच्या हातात असते. त्यादृष्टीने आवश्यक ती सुरक्षा ठेवली नाही तर आपल्या अकाऊंटचा वापर करून चोरटे बनावट अकाऊंट तयार करतात. त्याचा आपल्या जवळच्या लोकांची फसवणूक करण्यासाठी करतात. त्यामुळे प्रत्येकाने सुरक्षेचे नियम पाळणे आवश्यक आहे.
- दगडू हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे