आरटीई मुलांना शाळेबाहेर ठेवण्यासाठी का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2015 12:42 AM2015-06-16T00:42:43+5:302015-06-16T00:42:43+5:30

शाळेचा पहिल्या दिवस असल्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना मोठ्या आनंदाने आणि उत्साहाच्या वातावरणात शाळेत घेऊन जात असताना दिसत होते.

Do you have to keep RTE out of school? | आरटीई मुलांना शाळेबाहेर ठेवण्यासाठी का?

आरटीई मुलांना शाळेबाहेर ठेवण्यासाठी का?

Next

पुणे : शाळेचा पहिल्या दिवस असल्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना मोठ्या आनंदाने आणि उत्साहाच्या वातावरणात शाळेत घेऊन जात असताना दिसत होते. मात्र, शिक्षण विभागाने घालून ठेवलेल्या आरटीई प्रवेशामुळे शहरातील हजारो बालकांवर सोमवारी घरी बसण्याची वेळ आली. प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क मिळावा, यासाठी शिक्षण हक्क कायद्याची (आरटीई) अंमलबजावणी सुरू करण्यात आली. मात्र, आज याच कायद्यामुळे आमची मुले शाळेबाहेर राहिली आहेत, अशा संतप्त भावना पालकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दिल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राविण्यात आली. विद्यार्थ्यांना पूर्वप्राथमिक व प्राथमिक वर्गात प्रवेश देण्यात आला. मात्र, राज्य शासनाने प्रवेशप्रक्रिया सुरू असताना आरटीई प्रवेश केवळ पहिलीसाठी लागू राहतील, असा अध्यादेश प्रसिद्ध केला. त्यामुळे सुरू असलेली प्रवेशप्रक्रिया विस्कळीत झाली. न्यायालयात याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे.
अवंतिका सोनवणे यांच्यासह सुमारे ४० पालकांना कोथरूड येथील न्यू इंडिया स्कूलमध्ये प्रवेश मिळाला आहे. मात्र, ही सर्व मुले आरटीई प्रवेशापासून वंचित राहिली आहेत. अवंतिका सोनवणे म्हणाल्या, ‘‘शिक्षण विभागाने आमच्या मुलांना आरटीईअंतर्गत न्यू इंडिया स्कूलमध्ये पहिली व पूर्वप्राथमिक वर्गासाठी प्रवेश दिला; मात्र एकाही विद्यार्थ्याला प्रवेश देण्यात आलेला नाही. दोन ते अडीच महिन्यांपासून आम्ही शाळेचे खेटे घालत आहोत.’’ (प्रतिनिधी)

- ‘आज शाळेचा पहिला दिवस होता. त्यामुळे किमान आज तरी आमच्या मुलांना प्रवेश मिळेल का? याबाबत विचारणा करण्यासाठी काही पालक शाळेत गेलो होतो. मात्र, प्रवेशाबाबत शाळेकडून नकार कळविण्यात आला. सोमवारी आमच्याशेजारी राहणारी मुले शाळेत जात होती; परंतु आमची मुले शाळेत जाऊ शकली नाहीत. त्यामुळे मन खिन्न झाले,’ अशा भावना व्यक्त करून सोनवणे म्हणाल्या, ‘‘माझ्या मुलाला आरटीईनुसार न्यू इंडिया स्कूलमध्ये प्रवेश मिळाला होता. त्यामुळे मी विश्वनिर्मल प्रायमरी स्कूलमधून मुलाचा प्रवेश रद्द केला. मात्र, आता या शाळेतही माझ्या मुलाला प्रवेश मिळत नाही.त्यामुळे आरटीईमुळे मुलांना शिक्षणाचा हक्क मिळतो की ते प्रवेशापासून वंचित ठेवले जातात, हेच समजत नाही.

Web Title: Do you have to keep RTE out of school?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.