79 वर्षे जुन्या पुण्यातल्या या लिफ्टबद्दल तुम्हाला माहितीये का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 08:44 PM2019-01-07T20:44:20+5:302019-01-07T20:46:40+5:30
लक्ष्मी रस्त्यावरील कॉमनवेल्थ या इमारतीमध्ये 1940 साली बसवण्यात आलेली लिफ्ट अजूनही कार्यरत आहे.
पुणे : जमीनीपासून ते 15 व्या किंवा 20 व्या मजल्यापर्यंत क्षणार्धात लिफ्ट आपल्याला पाेहचवत असते. प्रत्येक इमारतीत लिफ्ट हमखास असतेच. सध्या तर लिफ्टमुळे जिने आपण विसरुनच गेलाे आहाेत. पण तुम्हाला पुण्यातल्या सर्वात जुन्या लिफ्टबद्दल माहितीये का?
लक्ष्मी रस्त्यावरील कॉमनवेल्थ या इमारतीमध्ये 1940 साली बसवण्यात आलेली लिफ्ट अजूनही कार्यरत आहे. कॅम्प भागातील एडिसन या दुकानाचे मालक चोप्रा यांनी ही लिफ्ट बसवली होती. आजही या लिफ्टचा मेन्टेनन्स चोप्रा यांच्याकडेच आहे. मोहनलाल चोप्रा यांच्या वडिलांनी ही लिफ्ट बसवली होती. मोहनलाल हे सध्या या लिफ्टचा मेन्टेनन्स पाहतात. या लिफ्टचे सर्व भाग हे इंग्लंडवरून आणण्यात आले होते. इंग्लंडच्या एका कंपनीची ही लिफ्ट आहे. त्यावेळी 6 हजार रुपयात ही लिफ्ट बसवण्यात आली होती. 3 जानेवारी 1940 रोजी ही लिफ्ट सुरु करण्यात आली होती. 79 वर्षानंतरही ती लिफ्ट आहे तशीच ठेवण्यात आली आहे. लिफ्टचे केबिन लाकडी असून, बटणंही जुन्याच पद्धतीची आहेत. सध्या या लिफ्टचे पार्ट्स बाजारात मिळत नाहीत. परंतु चोप्रा यांच्याकडेच ते पार्टस मिळतात. ही लिफ्ट लिफ्टमनशिवाय वापरण्यात येत नाही. त्यामुळे तिला टिकवून ठेवणे शक्य झाले आहे.
गेल्या 30 वर्षांपासून विनायक स्वामी हे लिफ्टमन म्हणून येथे काम करत आहेत. त्यांचे आणि या लिफ्टचे अनोखे ऋणानुबंध निर्माण झाले आहे. लिफ्ट सुस्तिथीत ठेवण्यात त्यांचाही मोठा वाटा आहे. तसेच मोहनलाल चोप्रा हे या लिफ्टचा उत्तम मेन्टेनन्स ठेवत असल्यामुळे लिफ्ट 80 वर्षानंतरही चालू स्तिथीत असल्याचे पाहायला मिळत आहे.