पुण्यातल्या भागांच्या पुढे बुद्रुक आणि खुर्द का लावण्यात येते माहितीये का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 04:48 PM2020-01-02T16:48:34+5:302020-01-02T16:50:14+5:30
पुण्यातल्या विविध भागांना बुद्रुक आणि खुर्द अशी नावे असल्याचे दिसून येते. यामागे एक रंजक इतिहास आहे.
तुम्ही जर पुण्यात आलात आणि रिक्षावाल्याला आंबेगाव, वडगाव, काेंढवा, हिंगण्याला जायचे आहे असे सांगितल्यास ते तुम्हाला पहिल्यांदा विचारतील की बुद्रुकला जायचे आहे की खुर्दला ? पुण्यातल्या काही ठिकाणांच्या पुढे बुद्रुक आणि खुर्द लावण्यात येतं. हे लावण्याच्या मागे एक रंजक इतिहास आहे.
पुण्यात आंबेगाव, वडगाव, काेंढवा, हिंगणे आणि बावधन या भागांच्या पुढे बुद्रुक आणि खुर्द लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे बुद्रुक म्हंटल्यास त्याचा पत्ता वेगळा असताे आणि खुर्द म्हंटल्यास त्याचा पत्ता वेगळा असताे. असे असण्यामागे एक कारण आहे. शिवाजी महाराजांच्या पुर्वी महाराष्ट्रात इस्लामी सत्तेचा आणि उर्दु भाषेचा माेठा प्रभाव हाेता. त्यामुळे उर्दु किंवा फारसी मिश्रीत भाषा बाेलली जायची. आदिलशाही,कुतुबशाही व मोघल यांच्या अमलात असलेल्या प्रदेशात बुद्रुक व खुर्द हे शब्द वापरले जायचे.
एखाद्या प्रदेशाचे जर नदी, रस्ता किंवा ओढ्यामुळे दाेन भाग पडले असतील तर ते समसमान कधीच नसतात. त्यातील एक माेठा असताे आणि एक छाेटा. त्यामुळे त्यातील माेठ्या भागाला बुजुर्ग म्हंटले जायचे तर छाेट्या भागाला खुर्द. पुढे बुजुर्ग या शब्दाचा अपभ्रंश हाेऊन त्याचे बुद्रुक झाले. आजही अनेक शहरांमध्ये तसेच गावांमध्ये असे बुद्रुक आणि खुर्द पाहायला मिळतात.