तुमच्या घरातही तुम्ही असेच थुंकता का? न्यायाधीशांचा तिघांना संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 12:33 PM2019-08-23T12:33:25+5:302019-08-23T12:36:03+5:30
न्यायालयासारख्या पवित्र ठिकाणी थुंकताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही..
पुणे : पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात गुटखा, तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांना गुरुवारी ताब्यात घेऊन सीबीआयचे विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्या वेळी न्यायाधीशांनी तिघांना चांगलेच फैलावर घेतले. ‘तुमच्या घरातही तुम्ही असेच थुंकता का?’ असा संतप्त सवाल करत न्यायालयासारख्या पवित्र ठिकाणी थुंकताना काहीच कसे वाटत नाही, असे म्हणत त्यांची कानउघाडणी केली.
विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांकडून न्यायालयाच्या परिसरात तंबाखू, गुटखा तत्सम पदार्थ खाऊन थुंकण्यात येत असल्याने न्यायालयाच्या इमारतींचे कोपरे लाल झाले आहेत. नागरिक, पक्षकार न्यायालयाचे पावित्र्य राखत नसल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांनी न्यायालयीन परिसरात अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रक काढले होते. न्यायालयाच्या आवारात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करता यावी यासाठी पोलीस, शिपाई आणि वकिलांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकातील अॅड. विकास शिंदे, अॅड. दीप्ती राजपूत, पोलीस हवालदार सुनील शिंदे, श्रेयश साळवी, आशिष पवार आणि आझाद पाटील हे
न्यायालयात कारवाईच्या उद्देशाने पाहणी करत असताना राम पांडुरंग मोरे (वय ६३, रा. देहू) ही व्यक्ती न्यायालयाच्या मुख्य इमारतीच्या मोकळ्या जागेत तंबाखू खाऊन थुंकत असल्याचे निदर्शनास आले. या व्यक्तीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यात आले. तसेच विशाल पंढरी शिंदे (वय २२, रा. औसा, लातूर) आणि प्रशांत दिलीप यादव (वय ३३ , रा. चिंचवड, पुणे) यांनाही तंबाखू आणि गुटखा खाऊन थुंकताना ताब्यात घेऊन सीबीआयचे विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांच्यासमोर हजर करण्यात आले.
या व्यक्तींनी न्यायालयात अस्वच्छता केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, न्यायाधीशांनी तिघांनाही चांगलेच फैलावर घेतले. ‘तुमच्या घरातही तुम्ही असेच थुंकता का?’ अशी विचारणा केली असता, तिघांनीही नाही, असे उत्तर दिले. त्यावर न्यायाधीशांनी मग न्यायालयासारख्या पवित्र ठिकाणी थुंकताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही, अशी विचारणा करून पोलिसांना तिघांवरही कारवाई करण्यास सांगितले.
मात्र, ६३ वर्षे वयाच्या व्यक्तीने शारीरिक व्याधींचे कारण देत एकवेळ माफ करावे, पुन्हा असे होणार नाही अशी अनेकदा विनंती केल्यानंतर न्यायाधीशांनी तीनही आरोपींना सुधारण्याची संधी देत पुन्हा असे करणार नसल्याबाबत माफीनामा लिहून देण्यास सांगितले. त्यानुसार तीनही व्यक्तींनी न्यायालयामध्ये तंबाखू खाऊन थुंकल्यामुळे आमच्याकडून अस्वच्छता झाली आहे, असा माफीनामा दिला.
न्यायालय परिसरात अस्वच्छता केल्याचे सिद्ध झाल्यास, तीन महिन्यांपर्यंत शिक्षा किंवा २ हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. आज न्यायाधीशांनी न्यायालय परिसरात अस्वच्छता करणाºयांना माफीनामा घेऊन सुधारण्याची संधी दिली असली, तरी यापुढे न्यायालयात अस्वच्छता करणाºयांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे अॅड. विकास शिंदे यांनी सांगितले.