तुम्हाला माझ्या तक्रारीपेक्षा बंदोबस्त महत्वाचा वाटतो का? २ महिलांनी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची वाहने थांबवून घातला वाद
By नम्रता फडणीस | Published: October 16, 2023 03:07 PM2023-10-16T15:07:58+5:302023-10-16T15:08:12+5:30
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : पोलीस वाहनाचा पाठलाग करुन त्यांच्या वाहनासमोर दुचाकी आडवी थांबविण्याचे स्टंट आजवर चित्रपटांमध्ये पाहिले असतील, पण पुण्यात दोन महिलांनी अशाप्रकारे स्टंटगिरी करीत वरिष्ठ पोलिस अधिका-यांची वाहने थांबवून एका पोलिसाला 'माझा जबाब तुम्ही आत्ताच घ्या, तुम्हाला माझ्या तक्रारीपेक्षा बंदोबस्त महत्वाचा वाटतो का? असा सवाल करुन पोलिसांशी वाद घातला. ही घटना 14 ऑक्टोबर रोजी पावणे नऊ ते सव्वा नऊच्या सुमारास पोल्ट्री चौक खडकी ते संगमवाडी बीआरटी बस स्टाँप जवळील फुटपाथ जवळ घडली. या प्रकरणी दोन महिलांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदननगर पोलिस स्टेशनचे तौसिफ सय्यद यांनी फिर्याद दिली आहे. पोल्ट्री चौक खडकी ते संगमवाडी बीआरटी बस स्टाँप जवळील फुटपाथ जवळ दुचाकीवरुन भरधाव वेगाने फिर्यादी यांचा पाठलाग केला. फिर्यादी हे वरिष्ठ पोलिस अधिका-यांसमवेत एका शासकीय कामासाठी जात होते. संगमवाडी येथे त्यांची दुचाकी आडवी लावून, त्यांची वाहने थांबवून महिलांनी रस्ता बंद केला. त्यांनी वाहनातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व फिर्यादी यांच्याशी वाद घातला. फिर्यादी हे गाडीतून खाली उतरले असता त्यांनी फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात त्यांना ढकलून दिले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रेरणा कुलकर्णी पुढील तपास करीत आहेत.