आग्य्राहून सुटका स्मृतिदिन करू : टिळक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 01:35 AM2018-12-06T01:35:26+5:302018-12-06T01:35:39+5:30
राजगड स्मारक मंडळ साजरा करीत असलेल्या आग्य्राहून सुटका स्मृतिदिनाला महापालिकेचा कोणताही विरोध नाही.
पुणे : राजगड स्मारक मंडळ साजरा करीत असलेल्या आग्य्राहून सुटका स्मृतिदिनाला महापालिकेचा कोणताही विरोध नाही. निधी थांबवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाबाबत गुरूवारी होणाऱ्या पक्षनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेऊ, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी मंडळाच्या पदाधिकाºयांनी बुधवारी दिली. या उत्सवासाठी देत असलेला निधी उच्च न्यायालयाच्या एका आदेशाचा आधार घेत दोन वर्षांपासून थांबवला आहे.
मंडळाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक उदय जोशी यांनी यासंदर्भात महापौर टिळक यांची बुधवारी भेट घेतली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले हेही त्या वेळी उपस्थित होते. जोशी यांनी मंडळाची भूमिका विशद केली. अंदाजपत्रकात या निधीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष आहे. हद्दीबाहेर निधी द्यायचा म्हणून काही वर्षांपूर्वी सभागृहाने एक तृतीयांश बहुमताने ठराव मंजूर केला आहे. गेल्या ३० वर्षांपासून महापालिका निधी देत आहे. तरीही निधी थांबवणे व तोही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील उच्च पराक्रमांचा दिवस साजरा करण्याचा हे अयोग्य असल्याचे मत जोशी यांनी व्यक्त केले.
महापौरांनी हा निर्णय प्रशासनाचा असल्याचे स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने एका प्रकरणात स्थानिक स्वराज्य संस्थांना सांस्कृतिक कार्यक्रमांवर खर्च करण्यास मनाई केली आहे. त्या आदेशाचा अर्थ लावत हा निधी थांबवला आहे. पक्षनेत्यांची गुरूवारी बैठक होत आहे. त्यात
हा विषय प्राधान्याने मांडला
जाईल. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही या पद्धतीने निर्णय घेतला जाईल, असे महापौरांनी जोशी यांना सांगितले. भिमाले यांनीही तसेच मत व्यक्त करत याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.
विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे संजय भोसले, मनसेचे वसंत मोरे या महापालिकेतील विरोधकांनी आधीच महापौर मुक्ता टिळक यांना पत्र देऊन हा निधी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पक्षनेत्यांच्या बैठकीत यासंदर्भात गुरुवारी सकारात्मक चर्चा होऊन निधी सुरू होईल,
असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला.
>असा होणार उत्सव
बुधवारी १२ डिसेंबरला सकाळी ९.३० वाजता सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळ येथून पालखीचे प्रस्थान होईल. तसेच शनिवार, दि. १५ व रविवार, दि. १६ डिसेंबर रोजी किल्ले राजगड येथे गड जागरण, ढोल-ताशा वादन, भारुड, सूर्योदयास ध्वजारोहण अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवाजी राजगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव प्रसादे यांनी दिली. मंडळाचे चिटणीस अनिल मते, खजिनदार दीपक उपाध्ये, योगेश भालेराव, माजी नगरसेवक उदय जोशी, मंगेश राव, संजय दापोडीकर, अजित काळे, पराग गुजराथी आदी उपस्थित होते. रविवार, दि. १६ डिसेंबर रोजी किल्ले राजगड येथे वंशपरंपरेनुसार गडकरी असलेले सूर्यकांत भोसले यांच्या हस्ते पहाटे ध्वजारोहण होईल. या वेळी इतिहास संशोधक कौस्तुभ कस्तुरे आणि महाराष्ट्र राज्य गड किल्ले संवर्धन समितीचे सदस्य डॉ. सचिन जोशी उपस्थित राहणार आहेत.