चांगले अधिकारी पुण्यालाच द्यायचे का?, मुख्यमंत्र्यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 03:38 AM2018-02-22T03:38:41+5:302018-02-22T03:38:50+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष तुकाराम मुंढे चांगले बदल करत असताना, अवघ्या १० महिन्यांत त्यांची बदली करण्यात आली.
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष तुकाराम मुंढे चांगले बदल करत असताना, अवघ्या १० महिन्यांत त्यांची बदली करण्यात आली. या एका प्राध्यापकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, केवळ पुण्यालाच चांगल्या अधिकाºयांची गरज नसून इतर शहरांनाही चांगले अधिकारी मिळाले पाहिजेत. मुंढे हे पुणे महापालिकेंतर्गत पीएमपीचा कार्यभार सांभाळत होते; मात्र आता त्यांची बदली नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावर केली आहे, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले.
सिम्बायोसिस लॉ स्कूलच्या ‘सिम्भव २०१८’ या दहाव्या आंतर महाविद्यालयीन वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी लॉ कॉलेजच्या प्राध्यापकांनी विचारलेल्या निवडक ४ प्रश्नांना फडणवीस यांनी उत्तरे दिली. या वेळी सिम्बायोसिसचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार जगदीश मुळीक, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, संचालक डॉ. शशिकला गुर्पूर आदी उपस्थित होते.
पीएमपीच्या सुधारणेसाठी मुंढे वेगाने पावले टाकत असतानाच तीन वर्षांचा कार्यकाळ होण्यापूर्वीच ही बदली झाल्याने पुणेकरांमध्ये नाराजी आहे. त्यासंदर्भात प्रामाणिक, कार्यक्षम अधिकाºयांना सदैव पाठिंबा देणारे मुख्यमंत्री म्हणून आपली ओळख आहे; मात्र मुंढे यांची बदली पुणेकरांना अनपेक्षित होती असा निर्णय शासनाने का घेतला, असा प्रश्न एका प्राध्यापकांनी विचारला. मुंढे यांच्यासारखे अधिकारी सर्वच शहरांना हवे आहेत, ते केवळ पुण्यालाच द्यायचे का, असा सवाल करून मुंढे यांना पीएमपी महामंडळावरून नाशिकच्या आयुक्तपदावर बढतीवर बदली केल्याची सावरासावर फडणवीस यांनी केली.
मॅग्नेटिक महाराष्ट्र या धोरणांतर्गत महाराष्ट्र ही भारतातील पहिली १ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचा आराखडा सादर केला आहे. जगभरात विविध देशातील अवघ्या १२ राज्यांना हे ध्येय गाठणे शक्य झाले आहे, तिच क्षमता महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. शिक्षण हे देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. भारतात बुद्धिमत्ता मुबलक प्रमाणात असून तिचा योग्य वापर होणे गरजेचे आहे असे मत शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.