कर्जमाफीवर बोलण्यासाठी मुहूर्त काढायचा आहे का? बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 13:33 IST2025-04-21T13:30:58+5:302025-04-21T13:33:36+5:30
निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, म्हणून सांगणारे मुख्यमंत्री आता मात्र त्यावर काहीच बोलत नाहीत

कर्जमाफीवर बोलण्यासाठी मुहूर्त काढायचा आहे का? बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
पुणे: निवडणुकीवेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, कोरा करू म्हणणारे मुख्यमंत्री आता मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर काहीच बोलत नाहीत. आम्ही मुख्यमंत्र्यांना शेतकरी कर्जमाफीवर बोला बोला, असे म्हणत आहोत. मात्र, ते त्यावर बोलतच नाहीत. शेतकरी कर्जमाफीवर बोलण्यासाठी त्यांना कुठल्या ब्राह्मणाकडून मुहूर्त काढायचा आहे का? की त्यांनी बोलावे, यासाठी आम्हाला महापूजा ठेवावी लागेल? असा सवाल प्रहार संघटनेचे संस्थापक माजी आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने गंजपेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित केलेल्या युवा संघर्ष निर्धार परिषदेस कडू उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर उपस्थित होते. कडू म्हणाले, आमचा अजेंडा गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांचा आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतो, जो शेतकरीविरोधी तो आमच्या विरोधी आहे. मग ते एकनाथ शिंदे असोत किंवा मुख्यमंत्री असोत. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, म्हणून सांगणारे मुख्यमंत्री आता मात्र त्यावर काहीच बोलत नाहीत. त्यांची नेमकी अडचण काय आहे, माहिती नाही. त्यांचे गणित चुकले आहे का, हे कळत नाही.
परभणीत एका शेतकरी पती - पत्नीने आत्महत्या केली, त्यासंदर्भात ते म्हणाले, शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत म्हणून त्याने आत्महत्या केली आणि ते कळल्यानंतर गर्भवती पत्नीने आत्महत्या केली. कोणी तरी महिला भगिनीने तेथे जाऊन यावे, यासाठी सुप्रिया सुळे यांना मी फोन करणार होतो. यासंदर्भात मी पालकमंत्र्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र, तो झाला नाही. पैसा नाही व कर्ज आहे म्हणून आत्महत्या होणे, हे महाराष्ट्राला शोभणारे नाही, असेही कडू म्हणाले.