विधानसभेला मतदान करायचंय ना! नाव नोंदणीसाठी उद्या शेवटची संधी, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
By नितीन चौधरी | Published: October 18, 2024 06:40 PM2024-10-18T18:40:17+5:302024-10-18T18:42:00+5:30
शनिवार १९ ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदवल्यास मतदानाचा पवित्र हक्क बजावता येईल
पुणे : राज्यात विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदार यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे. त्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांनी आपले नाव प्राधान्याने मतदार यादीत समाविष्ट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे. ज्यांनी आपले नाव मतदार यादीत अद्याप समाविष्ट केलेले नाही त्यांना आज (दि.१९) शेवटची संधी आहे. त्यामुळे त्यांनी आजच मतदार यादीत आपले नाव नोंदवावे.
आपले नाव मतदार यादीत समाविष्ट झाले असल्याची खात्री प्रत्येक मतदाराने करावी. तसेच अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना शनिवारी रात्रीपर्यंत ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करावी. जेणेकरून मतदानाचा पवित्र हक्क बजावता येईल. नागरिकांना निवडणूक आयोगाच्या व्होटर हेल्पलाइन ॲपद्वारे घरबसल्या मतदार यादीमध्ये नावनोंदणी करता येईल. यासाठी वयाचा आणि निवासाचा पुरावा आवश्यक आहे. ज्या पात्र नागरिकांची आतापर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे. मतदारांनी मतदार यादीमध्ये आपले नाव यादीत आहे किंवा नाही याची खात्री https://electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर करावी. मतदार यादीत नाव नसल्यास अर्ज क्र. ६ भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे शनिवारपर्यंत सादर करावा, असे आवाहनही डाॅ. दिवसे यांनी केले आहे.