पुण्यातले डाॅक्टर म्हणतायेत, तपासणीला येताना माेबाईल नकाेच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 05:19 PM2018-12-20T17:19:19+5:302018-12-20T17:23:46+5:30
पुण्यातील डाॅक्टर पाट्यांच्या माध्यमातून तपासणी कक्षात येण्यापूर्वी माेबाईल फाेन बाहेर ठेवण्याचे किंवा बंद करण्याचे आवाहन पेशंट्सला करत आहेत.
पुणे : माेबाईल आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक झाला आहे. प्रत्येकाचा दिवसातील बराचसा वेळ हा माेबाईलवर घालविला जात आहे. अनेकांना माेबाईलचे व्यसन देखील लागले आहे. माेबाईलचे जसे फायदे आहेत तसेच माेबाईलचे अनेक ताेटे देखील आहेत. या माेबाईलला कंटाळून पुण्यातील डाॅक्टरांनी आपल्या क्लिनिकमध्ये पाट्या लावल्या आहेत. पुण्यातल्या पाट्यातर सर्वश्रुत आहेत. आता पुण्यातल्या डाॅक्टरांनी लावलेल्या पाट्या लक्ष वेधून घेत असून या पाट्यांच्या माध्यमातून डाॅक्टर तपासणी कक्षात येण्यापूर्वी माेबाईल फाेन बाहेर ठेवण्याचे किंवा बंद करण्याचे आवाहन पेशंट्सला करत आहेत.
पुण्यातल्या अनेक हाॅस्पिटल्स आणि क्लिनिक्समध्ये तपासणीसाठी येताना माेबाईल स्विच ऑफ करुन ठेवावा किंवा माेबाईल बाहेर रेसेप्शनला ठेवावा अशा सूचना लिहीलेल्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. तपासणी सुरु असताना किंवा डाॅक्टर रुग्णाला समुपदेशन करत असताना माेबाईल वाजल्याचे अनेक प्रकार घडत असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य राहत नाही. तसेच लिंक तुटते. अनेकदा पेशंटचे नातेवाईक डाॅक्टरांसमाेरच फाेन उचलून तेथेच समाेरच्या व्यक्तीशी बाेलतात. त्यामुळे हाॅस्पिटल किंवा क्लिनीक सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी माेबाईल वापरण्यास आता डाॅक्टर्स प्रतिबंध घालत आहेत.
स्त्री राेग तज्ञ असलेल्या डाॅ. मिनाक्षी देशपांडे यांनी आपल्या क्लिनिकमध्ये तपासणी कक्षामध्ये येण्याअगाेदर माेबाईल बंद ठेवावा अशी पाटी लावली आहे. मिनाक्षी देशपांडे म्हणतात. पेशंटशी बाेलताना फाेन वाजल्यास संपूर्ण वातावरण डिस्टर्ब हाेते. डाॅक्टर जे समुपदेशन करत असतात त्यात व्यत्यय येताे. काही पेशंट आणि नातेवाईक डाॅक्टरांच्या समाेरच फाेन उचलून समाेरच्याशी बाेलतात. असं करणे चुकीचे आहे. डाॅक्टर समुपदेशन करताना फाेन बंद ठेवणे आवश्यक आहे. सर्वानांच सारखा नियम असावा म्हणून आम्ही फाेन बंद ठेवावा अशी पाटी लावली आहे.
गॅलक्सी रुग्णालयात तर समुपदेशन कक्षामध्ये जाण्यापूर्वी आपला फाेन बाहेर ठेवावा अशी सूचना लावण्यात आली आहे. समुपदेशन झाल्यानंतर बाहेर पडताना तुम्ही तुमचा माेबाईल पुन्हा घेऊ शकता. असेही त्या सुचनेत लिहीण्यात आले आहे. निगडीमध्ये ईएनटी सर्जन असलेले डाॅ. सुधीर भालेराव म्हणाले, समुपदेशन कक्षामध्ये डाॅक्टर रुग्णाला महत्त्वाची माहिती सांगत असतात. त्यावेळी माेबाईल वाजल्यास त्यात खंड पडू शकताे. डाॅक्टर जी काही माहिती रुग्णाला देतायेत ती याेग्य प्रकारे त्याच्यापर्यंत जाणं आवश्यक आहे. त्यामुळे थाेडावेळासाठी माेबाईल बंद ठेवणे आवश्यक आहे. तसेच रुग्णालयातील अनेक उपकरणे ही सेन्सिटीव्ह असतात. माेबाईलच्या रेडियेशन्समुळे ती खराब देखील हाेऊ शकतात. अचानक फाेन वाजण्यामुळे किंवा माेठ्याने फाेनवर बाेलल्याने इतर रुग्णांनाही त्याचा त्रास हाेताे. रुग्णाला आरामाची गरज असते, त्यामुळे रुग्णालयात फाेन बंद किंवा सायलेन्ट ठेवणे आवश्यक आहे.