वेगळीच 'केस'; कोणतीही पदवी नसताना पुण्यातील तोतया डॉक्टरने केल्या 300 हेअर ट्रान्सप्लांट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 04:30 PM2021-12-04T16:30:15+5:302021-12-04T17:07:06+5:30

कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर असेल तर त्याची नोंदणी महापालिकेकडे करणे बंधनकारक आहे...

doctor 300 hair transplants medical professionals without any degree | वेगळीच 'केस'; कोणतीही पदवी नसताना पुण्यातील तोतया डॉक्टरने केल्या 300 हेअर ट्रान्सप्लांट

वेगळीच 'केस'; कोणतीही पदवी नसताना पुण्यातील तोतया डॉक्टरने केल्या 300 हेअर ट्रान्सप्लांट

googlenewsNext

पुणे : कोणतीही पदवी नसताना नागरिकांना वैद्यकीय व्यावसायिक असल्याचे सांगून हेअर ट्रान्सप्लांट करुन लोकांची गेल्या ३ वर्षांपासून फसवणूक करणार्‍या तोतया डॉक्टराला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. शाहरुख ऊर्फ समीर हैदर शाह (वय २४, रा. गणेशनगर, वडगाव शेरी) असे या तोतया डॉक्टराचे नाव आहे. केवळ दहावी पास असताना परिचारिका म्हणून त्याच्या क्लिनिकमध्ये काम करणार्‍या अन्य दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा गलांडे यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ त्यानुसार पोलिसांनी विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात असलेल्या डॉ. हेअर मॅजिका हेअर ट्रान्सप्लांट अँड अ‍ॅस्थेटिक स्टुडिओ येथे कारवाई करुन डॉक्टरला अटक केली आहे.

शाहरुख शाह याने गेल्या ३ वर्षांपासून हे हेअर ट्रान्सप्लांट क्लिनीक सुरु केले होते. तो हेअर ट्रान्सप्लांटसाठी प्रत्येकाकडून २५ ते ३० हजार रुपये घेत असे. त्याच्याविषयी तक्रारी आल्यानंतर महापालिकेकडून त्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने केवळ बीएस्सी पर्यंत शिक्षण घेतले असल्याची माहिती पुढे आली. त्याच्याकडे हेअर ट्रान्सप्लांट विषयी कोणतीही पदवी नसल्याने आढळून आल्याने महापालिकेने त्याच्यावर कारवाई केली आहे. त्याने क्लिनिकमध्ये ठेवलेल्या दोन महिलांना परिचारिकेचे कोणतेही शिक्षण नसताना त्यांच्याकडून परिचारिका म्हणून काम करुन घेतले जात होते.

याबाबत डॉ. रेखा गलांडे यांनी सांगितले की, कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर असेल तर त्याची नोंदणी महापालिकेकडे करणे बंधनकारक आहे. शाह याने अशी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्याच्याविषयी गुन्हे शाखेकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार विमानतळ येथील शाह याच्या क्लिनिकवर शुक्रवारी अचानक छापा घालण्यात आला. त्यात त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी आढळून आली नाही. त्याच्याकडे कामाला असणार्या दोन महिलांनाही आवश्यक असे कोणतेही प्रशिक्षण नव्हते. तो वैद्यकीय व्यावसायिक असल्याचे सांगून लोकांच्या जीवाशी खेळत होता. त्याच्याकडील रेकॉर्डची तपासणी केल्यावर त्याने आतापर्यंत अशा ३०० हून अधिक हेअर ट्रिटमेंट केल्याचे आढळून आले असून त्याचे बहुतांश रोख पैसे घेण्यात आल्याचे दिसून आले आहे.

Web Title: doctor 300 hair transplants medical professionals without any degree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.