बारामती रुग्णालयात डॉक्टरला मारहाण
By Admin | Published: May 9, 2015 03:22 AM2015-05-09T03:22:18+5:302015-05-09T03:22:18+5:30
शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रात्री २ वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी आणलेल्या रुग्णाबरोबरच्या तरुणांनी प्रशिक्षणार्थी डॉक्टरला मारहाण केली.
बारामती : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रात्री २ वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी आणलेल्या रुग्णाबरोबरच्या तरुणांनी प्रशिक्षणार्थी डॉक्टरला मारहाण केली. त्याचबरोबर महिला डॉक्टर व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून दहशत माजविली. रुग्णालयातील साहित्याची नासधूस केली. या प्रकरणी तिघां जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. मद्याच्या नशेत या आरोपींनी हा प्रकार केला. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यामध्ये दहशतीचे वातावरण होते. मारहाण झालेल्या डॉक्टरांवर उपचार करण्यात आले.
या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळपासून बाह्य रुग्ण विभागाच्या कामकाजावर वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांनी बहिष्कार टाकला. रुग्णालयात असुरक्षिततेचे वातावरण आहे. आरोपींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत कामकाज केले जाणार नाही. रुग्ण तपासणी करणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे सकाळी उपचारासाठी आलेल्या रुग्णांची गैरसोय झाली. मात्र, आरोपींनी केलेल्या मारहाणीच्या निषेध सर्वच स्तरातून झाला. मेडिकोज गिल्ड या डॉक्टरांच्या संघटनेने आरोपींवर कारवाई करण्यासाठी बारामती शहर पोलीस ठाण्यात निवेदन दिले. मारहाण झालेल्या डॉक्टरांची माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, डॉ. अशोक तांबे, नगरसेवक सुभाष ढोले, टि. व्ही. मोरे आदींनी विचारपूस केली.
रात्री २ वाजण्याच्या सुमारास आरोपी बापू रावसाहेब आगम, रोहित केशव जगताप आणि अन्य एक साथीदार रुग्णालयात आले. त्यातील एकाला मद्याच्या नशेत गाडीवरून पडल्याने जखम झाली होती. त्याच्यावर उपचार करण्यासाठी महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एन. तांबारे, प्रशिक्षणार्थी डॉ. महेश करे तातडीच्या उपचाराच्या खोलीत आले असता जगताप आणि त्याच्याबरोबरच्या जोडीदाराने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
रुग्णालयात दोन महिला वैद्यकीय अधिकारी यांच्यासह नर्स, डॉ. करे, शिपाई असे चार ते पाच अधिकारी, कर्मचारी होते. आरोपींनी शिवीगाळ करून लवकर ड्रेसींग कर, असे म्हणत डॉ. करे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी, नर्स यांनी जवळच्या खोलीचा आश्रय घेतला. तो पर्यंत या आरोपींनी खोलीचा दरवाजा बाहेरून लावून घेतला. त्यामुळे घबराट पसरली. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करीत असताना पुन्हा डॉ. करे यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या मागे कात्री घेऊन आरोपी धावले. दरम्यानच्या काळात शहर पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. पोलीस येईपर्यंत आरोपींनी रुग्णालयातील काही वस्तुची नासधूस केली. त्याचबरोबर टेलिफोन फोडला. पोलीस येईपर्यंत आरोपी पळून गेले.
या घटनेचा त्यांनी निषेध केला. त्याचबरोबर आरोपींवर तातडीने कारवाई करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात निवेदन दिले. (वार्ताहर)