पुण्यात मांजर दगावली म्हणून डॉक्टरांना मारहाण; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 10:40 AM2022-12-17T10:40:45+5:302022-12-17T10:41:44+5:30
पशुवैद्यकीय संघटना आक्रमक : हडपसर पोलिसांकडून गुन्हा दाखल...
पुणे : रुग्ण दगावला, म्हणून रुग्णालयाची तोडफोड होत होती. त्या विरोधात कायदा करण्यात आला. मात्र, हडपसरमध्ये मांजर दगावली, म्हणून तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. सर्व पशुवैद्यकीय अधिकारी संघटना यावरून आक्रमक झाल्या असून, त्यांनी २२ डिसेंबरला सर्व पशुवैद्यकीय दवाखाने बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.
हडपसर पोलिसांनी या संदर्भात एक महिला व अन्य चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हडपसरमधील डॉग ॲन्ड कॅट क्लिनिकचे संचालक डॉ.रामनाथ ढगे यांनी सांगितले की, १० डिसेंबरला त्यांच्याकडे एक दाम्पत्य त्यांची मांजर घेऊन उपचारासाठी म्हणून आले. त्या मांजरीची प्रकृती नाजूक झाली होती. सलग ८ ते १० दिवस तिने काहीच खाल्लेले नव्हते. मांजराचे आवश्यक ते लसीकरणही केलेले नव्हते. तिचे शरीर थंड पडत चालले होते.
डॉ.ढगे यांनी सांगितले की, मांजराची आवश्यक ती तपासणी करून, तिच्या प्रकृतीची त्या दाम्पत्याला पूर्ण कल्पना दिली. त्यांनी संमती दिल्यानंतर तपासणीसाठी म्हणून मांजरीच्या रक्ताचा थोडासा नमुना घेण्यात आला. मांजराला इंजेक्शन देण्यात आले. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही व मांजर दगावले. ते दाम्पत्यास सांगितल्यावर त्यांनी लगेचच आरडाओरडा सुरू केला. मांजराला मारले, असा आरोप केला. फोनवरून त्यांनी चार जणांना क्लिनिकमध्ये बोलावून घेतले. त्यांनी आल्याबरोबर मारहाण सुरू केली. जमिनीवर खाली पाडून मारले. दवाखाना फोडण्याची धमकी दिली. यात डॉ.ढगे यांच्या पायाचे हाड मोडले. ते सर्व जण गेल्यानंतर डॉ.ढगे यांनी पोलिस चौकीत जाऊन तक्रार नोंदविली. त्यावरून पोलिसांनी संबंधित महिला व अन्य चार जणांवर गुन्हा दाखल केला.
पेट डॉक्टर असोसिएशन ऑफ पुणे यांनी या घटनेचा निषेध केला. २२ डिसेंबरला सर्व खासगी पशुवैद्यकीय दवाखाने दुपारी ३ पर्यंत बंद ठेवण्याचा इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलनेही या घटनेचा निषेध केला आहे. राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेच्या पुणे जिल्हा शाखेने पोलिस आयुक्तांना पत्र लिहून संबंधित व्यक्तींना कठोर शिक्षा व्हावी, त्यांच्या आरोपपत्रात कसलीही सूट राहू नये, असे कळविले आहे. पशुवैद्यक अधिकाऱ्यांच्या अन्य संघटनांनीही या घटनेचा निषेध केला आहे. अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत, यासाठी सरकारने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.