डॉक्टर मारहाण प्रकरण: नगरसेविका आरती कोंढरे यांना जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 04:01 AM2019-03-15T04:01:40+5:302019-03-15T04:01:49+5:30
रुग्णालयामध्ये न जाण्याची घातली अट
पुणे : ससून रुग्णालयातील महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी नगरसेविका आरती कोंढरे यांना सत्र न्यायालयाने गुरुवारी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. रुग्णालयामध्ये न जाण्याच्या अटीवर सत्र न्यायाधीश एन. एम. जमादार यांनी हा जामीन मंजूर केला.
कोंढरे यांनी मारहाण केल्याची फिर्याद रुग्णालयातील डॉ. स्नेहल अशोक खंडागळे (वय २६) यांनी दिली आहे. हा प्रकार दि. १३ मार्च रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास रुग्णालयात घडला. या वेळी डॉ. खंडागळे या एका रुग्णावर उपचार करीत होत्या. कोंढरे यांनी तिथे येऊन दुसऱ्या रुग्णाविषयी विचारणा केली. ‘या ठिकाणी कोण डॉक्टर आहेत, कोण पाहत आहे?’ अशी आरडाओरड केली. तसेच त्यांनी छायाचित्रे व व्हिडीओ शूटिंगही सुरू केले. खंडागळे यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोंढरे यांनी आपल्याला शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार खंडागळे यांनी केली आहे. याप्रकरणी कोंढरे यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे आणि डॉक्टर संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी कोंढरे यांनी न्यायालयात अर्ज केला. त्यावर गुरुवारी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
नगरसेविका आरती कोंढरे यांचा निषेध
लोकांची सेवा करण्यासाठी निवडून दिले अशा जबाबदार नगरसेविका आरती कोंढरे यांनी डॉक्टरांना मारहाण करणे ही घृणास्पद गोष्ट आहे. अशा गोष्टींना योग्य वेळी डॉक्टरांच्या संरक्षणासाठी जो कायदा केला आहे त्या कायद्याच्या नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांनी केली आहे. तसेच, भाजपाच्या नगरसेविका कोंढरे यांचा राष्ट्रीय डॉक्टर सेल यांच्यातर्फे आम्ही निषेध करीत आहोत आणि तातडीने डॉक्टर प्रोटेक्शन अॅक्टनुसार कारवाई करण्यात यावी. हे त्वरित झाले नाही, तर आम्ही डॉक्टरांच्या वतीने आंदोलन करणार आहोत, असा इशारा या वेळी राष्ट्रवादी डॉक्टर सेलने दिला.