ठार मारण्याची धमकी देत डॉक्टर महिलेकडून मागितले पाच लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:10 AM2021-01-14T04:10:53+5:302021-01-14T04:10:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सय्यदनगर येथील बांधकाम सुरु असलेल्या साईटवर काही जण ‘कोरोना सेवक’ असल्याचे सांगून कामगारांची माहिती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सय्यदनगर येथील बांधकाम सुरु असलेल्या साईटवर काही जण ‘कोरोना सेवक’ असल्याचे सांगून कामगारांची माहिती घेऊ लागले. एकेका कामगाराला बोलावून त्यांची माहिती टिपून घेतली जात होती. प्रत्येकाचा मोबाईल नंबर घेतला जात होता. त्यानंतर ‘तो’ समोर आला. त्याने मोबाईल नंबर सांगितल्यावर तो टिपून घेण्याचा इशारा केला. दुसरा म्हणाला की, तुझ्या अंगात ‘टेम्परेचर’ दिसते आहे, तू जरा बाजूला उभा रहा म्हणून त्याला एका बाजूला घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी खरे रुप दाखवून ‘त्याला’ पोलीस ठाण्यात आणले. अतिशय चलाखीने पोलिसांनी वेशांतर करुन ‘या’ संशियत खंडणीखोरास पकडले.
राकेश नरेश पाटील (रा. सय्यदनगर, मुळ छत्तीसगड) असे या खंडणीखोराचे नाव आहे. त्याने एका महिला डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी देऊन ५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मार्केटयार्ड पोलिसांनी याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करुन २४ तासाच्या आत तपास करून आरोपीला पकडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला डॉक्टर आहेत. बिबवेवाडी-कोंढवा परिसरात त्यांचा दवाखाना आहे. सोमवारी सकाळी डॉक्टर महिलेच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन केला. हिंदी भाषेत तो म्हणाला, “मै कुरेशी बात कर रहा हूं. अभी मेरी बात ध्यान से सुनो. तुम्हारे पतीने तुम्हारी और तुम्हारे बच्चे का मर्डर करने की सुपारी ५ लाख रुपये मे दी है. मै बच्चों की सुपारी नही लेता. तुम्हारे बच्चों को बचाना है तो ५ लाख रुपये दो. वैसे तो मुश्कील है पर यही एक रास्ता बाकी है,” अशी धमकी दिली.
डॉक्टर महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेेषणाद्वारे तपास करत असताना, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दुर्योधन पवार यांना बातमी मिळाली होती की, फोनद्वारे खंडणीची मागणी करणारा संशयित व्यक्ती सय्यदनगर परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी काम करतो आहे. त्यानुसार पोलिसांनी वेशांतर करून राकेश पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्याने डॉक्टर महिलेला कॉल केल्याचे समोर आले आले. ही कामगिरी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष शिंदे कर्मचारी अनिस शेख, स्वप्नील कदम, घुले यांच्या पथकाने केली.